(रत्नागिरी)
गीता जयंतीनिमित्त आज शुक्रवारी गीता भवन येथे गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्र, संस्कृत भारती सहा संस्थांनी एकत्र येत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायण केले. सकाळी चार तास चाललेल्या या पारायणात १२५ हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठांनी सहभाग घेतला.
व्यासपीठावर गीता मंडळाचे विश्वस्त अॅड. मिलिंद पिलणकर, नारायणी पठण मंडळाच्या ज्येष्ठ सदस्य सौ. उज्ज्वला पटवर्धन, स्वानंद पठण मंडळाच्या प्रमुख अश्विनी जोशी, कवीकुलगुरू कालिदास विश्वविद्यालय, डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय संस्कृत विभागप्रमुख तथा समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत भारतीचे अॅड. आशिष आठवले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी अभ्यासिका प्रा. अंजली बर्वे म्हणाल्या की, भगवद्गीता युवा पिढीने वाचायला हवी. गीतेचा प्रसार कलियुगात कसा करू याचा विचार केला पाहिजे. गीता ही गंगेपेक्षा पवित्र आहे. कारण ती साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुखकमलातून आली आहे. गीता धार्मिक व अध्यात्मिक दृष्टीने वाचू नका, यात कर्मकांड नाही. जीवनात आनंद, समाधान, शांती देण्यासाठी गीता पठण करा. याचे महत्त्व पटवून देता आले तर अधिकाधिक लोक गीतापठणाकडे वळतील. गीतेतील तत्वचिंतन आचरणात, जीवनात कसे येईल, याकरिता प्रयत्न करावेत. गीतेतले तत्वज्ञान कुठे कुठे आले आहे, हे आपण शोधले पाहिजे. अनेक गाणी, व्याख्याने, आता नवीन माध्यम म्हणजे सोशल मीडियातले व्हिडिओसुद्धा गीतेतील तत्त्वज्ञानावर आधारित असतात. ज्ञानप्रसार केला पाहिजे. माझ्या आचरणात येतंय का, हे प्रयत्नांनी साध्य करावे.
प्रमुख पाहुणे डॉ. दिनकर मराठे म्हणाले की, आजच्या सुमुहुर्तावर गीता जयंती कार्यक्रम वृद्धिंगत होणार आहे. गीताजयंतीला आज ५१२५ वर्षे पूर्ण होत आहेत. भगवद्गगीतेवर प्रादेशिक भाषांमध्ये २००० हून अधिक टिका लिहिल्या आहेत. वेद अध्याययनासाठी पूर्वतयारी लागते. परंतु गीताभ्यासात लहान मुलांपासून महिला, ज्येष्ठांपर्यंत कोणीही प्रवेश घेऊ शकतो. आपापल्या शक्तीनुसार गीतेचा अर्थ कळतो. गीतेचे अध्ययन म्हणजे सर्व शास्त्रांचे अध्ययन. संस्कृतीचे स्वरूप, संस्कारांचे ज्ञान मिळते. व्यावहारिक ज्ञान मिळते.
प्रास्ताविकात गीता मंडळाचे विश्वस्त अॅड. मिलिंद पिलणकर यांनी सांगितले की, अर्जुन गोंधळलेला होता का, त्याकरिता ७०० श्लोकांच्या गीतेतून श्रीकृष्णाने सांगितले, परंतु गीता आपल्या मनुष्य जन्मासाठी अत्यंत आवश्यक आहे. गीतेच्या अभ्यासातून आपले जीवन समृद्ध करा. गीता प्रसारासाठी आपल्याला जी कल्पना सुचेल ती येऊन आम्हाला सांगा आपण गीता मंडळातर्फे एकत्रित कार्यक्रम करू. सर्वतोपरी सहकार्य करू.
गीता पठणामध्ये योजना घाणेकर, वंदना घैसास, उज्ज्वला पटवर्धन आणि अश्विनी जोशी यांनी नेतृत्व केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी या कार्यक्रमाचे नियोजन कसे करण्यात आले, हे सांगून आभार मानले. श्रीकृष्णाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व आयोजक संस्थांसह गीता मंडळाच्या ज्येष्ठ विश्वस्त श्रद्धा पत्की, संदेश कीर यांनी मेहनत घेतली.