( रत्नागिरी / प्रतिनिधी )
“गाव तेथे मानसोपचार” या राज्यव्यापी अभियानाचा एक अविभाज्य भाग असलेले आपल्या रत्नागिरी परिसरातील मानसोपचारतज्ञ डॉ कृष्णा पेवेकर, डॉ अतुल ढगे व डॉ मृण्मयी पेवेकर तरुणांना महाविद्यालये, शाळा येथे प्रत्यक्ष होणाऱ्या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 26 जून ते 31 जुलै दरम्यान आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजीत करावयाचा असल्यास आपल्या जवळच्या मनोविकातज्ञाशी किंवा 9503421124 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉ अतुल ढगे यांनी केले आहे.
मनोविकारतज्ञ विद्यार्थ्यामध्ये व तरुणांमध्ये व्यसनांविषयी 26 जून ते 31 जुलै दरम्यान जनजागृती करणार आहेत. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्वाचे आहे. भारतात आजही मानसिक स्वास्थ्य आणि त्याच्याशी निगडित आजारांविषयी, त्यांच्या उपचाराविषयी गैरसमज आहेत. शारीरिक आजार असेल तर फक्त त्या एका व्यक्तीला त्रास होतो. पण मानसिक आजार असेल तर मात्र त्यामुळे पूर्ण कुटुंबाला त्रास होतो. पूर्ण कुटुंब विस्कळीत होते. राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ञांनी एकत्र येऊन “गाव तिथे मानसोपचार- राज्यव्यापी मनस्वास्थ्य जनजागृती अभियान” या अनोख्या समाजप्रबोधनपर उपक्रमाची सुरुवात केलेली आहे.
शाळा, महाविद्यालये, विविध संस्था या ठिकाणी चर्चासत्र आयोजित करणे, जागरूकता अभियान राबवणे, गाव पातळीवर आणि वस्ती पातळीवर कॅम्प घेणे, समाजातील तरुणांना व्यसनमुक्ती बद्दल मार्गदर्शन करणे अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मानसिक आजाराविषयी गैरसमज व कलंकाची भावना दूर करणे जेणेकरून लोक इतर आजारांप्रमाणे मानसिक आजारी रुग्णाला स्विकारतील. त्यावर योग्य प्रकारे उपचार घेतील व त्यामुळे रुग्णाची व सर्व कुटुंबियांची फरफट व त्रास थांबेल असा आहे. या अभियानाचे पहिले तीन टप्पे याआधी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एप्रिल 2018 मध्ये नैराश्याचा आजार या विषयी जनजागृती करण्यात आली होती ज्यामध्ये महाराष्ट्रातील 40 मनोविकारतजानी महाराष्ट्रभर जनजागृती केली होती. त्यानंतर जून 2018 मध्ये स्किजोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) या आजाराबाबत महाराष्ट्रातील 148 मनोविकारतज्ञांनी महाराष्ट्रभर जनजागृती केली होती. तिसरा टप्पा मार्च 2019 मध्ये घेण्यात आला होता त्यामध्ये ‘मुलांना समजून घेताना’ या घोषवाक्यासाह मुलांच्या मानसिक आरोग्यविषयी जनजागृती केली होती.
मानसिक आजारातील एक सर्वात मोठा आजार म्हणजे व्यसनांचा आजार. सध्याच्या काळात आणि विशेषतः कोरोना नंतर तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले आहे आणि याला आळा घालणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन चौथ्या टप्प्यात “नशामुक्त भारत, स्वस्थ भारत” या घोषवाक्यासह व्यसनांच्या आजारांविषयी राज्यभरात जनजागृतीचा प्रयत्न केला जाणार आहे. हा चौथा टप्पा 26 जूनला सूरु होणार असून ते 31 जुलैला याची सांगता होणार आहे.
लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये व्यसनाधीनतेविषयी गैरसमज दूर करणे, त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यास मदत करणे, व्यसन हाही एक मानसिक आजार आहे, त्याकरिता प्रतिबंधक उपाय आहेत आणि शास्त्रीय उपचार उपलब्ध आहे, याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. ज्यामुळे सशक्त व्यसनमुक्त तरुणाई तयार होण्यास मदत होऊन देशाच्या विकासाला हातभार लागेल.
मूल व्यसन करतेय लक्षात आल्यावर लगेचच मनोविकारतज्ञाची मदत घ्या : अतुल ढगे
कुमारवयातील मुलांमध्ये व तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. आधीच व्यसनाबाबत त्याच्या परिणामाबद्दल त्यांना पूर्ण माहिती असेल तर ते हे प्रयोग करणार नाहीत. आपले मूल व्यसन करते आहे हे लक्षात आल्यावर लगेचच मनोविकारतज्ञाची मदत घेतल्यास हा आजार लगेचच काबूत आणता येऊ शकतो. कारण वेळ दवडल्यास या आजारावर उपचार करण्यास अवघड जाऊ शकते.
-डॉ अतुल ढगे
……………………………………..
व्यसनापासून दूर राहा : कृष्णा पेवेकर
अंमली पदार्थ काही निमित्ताने व्यक्तींच्या आयुष्यात शिरकाव करतात. या व्यक्ति त्यांच्या आहारी जाऊन कधी उदध्वस्त होतात त्यांचं त्यांनाच कळत नाही. बरं याचा तो एकटाच बळी पडतो असं नाही तर सगळ्या कुटुंबाची वाताहात लागते. या व्यसनांसंदर्भात बरीच गुंतागुंती असली तरी एक सहजसाध्य गोष्ट म्हणजे व्यसनमुक्तीसाठीचा प्रयत्न,
– डॉ. कृष्णा पेवेकर
………………………………….
व्यसनांमुळे गरिबी, घरगुती समस्या व हिंसाचारात वाढ : मृण्मयी पेवेकर
व्यसनाधीनतेचा विळख्यात युवा तरुण, वृद्ध अशी बरीच जण अडकतात. व्यसनाधिनता हा एक फक्त मानसिक आजार नसून ती सामाजिक, घरगुती, व्यवसायिक व राष्ट्रीय समस्याही आहे. व्यसनांमुळे गरिबी, घरगुती समस्या व हिंसाचारात वाढ होते. व्यक्तीला व त्याच्या घरच्यांना आर्थिक समस्यांचा सामना करायला लागतो.
– डॉ. मृण्मयी पेवेकर.