(रत्नागिरी)
तालु्क्यातील गावडे आंबेरे येथील विहिरीत दोन प्रौढांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना रविवारी (१७ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान उघडकीला आली. यातील एक मृतदेह अंदाजे ४५ वर्षे तर दुसरा अंदाजे ५० वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.
याबाबत गावडे आंबेरे येथील पोलिस पाटील अदिती लाड यांनी पूर्णगड पोलिस स्थानकात माहिती दिली. रविवारी सकाळी गावडेआंबेरे येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत दोन मृतदेह तेथील ग्रामस्थांना दिसले. यातील एक मृतदेह अंदाजे ४५ तर दुसरा अंदाजे ५० वर्ष वयाच्या प्रौढाचा आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलिस पाटील लाड यांना माहिती देताच त्यांनी पूर्णगड पोलिसांना याची माहिती दिली.
पूर्णगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. यातील अंदाजे ४५ वर्षे वय असलेल्या प्रौढाच्या अंगात काळा टी- शर्ट, चॉकलेटी ट्रॅक पॅन्ट, गळ्यात जानवे, हातात लाल दोरा आहे. तर ५० वर्षे वय असलेल्या प्रौढाच्या अंगात पांढरा टी-शर्ट आणि राखाडी ट्रॅक पॅन्ट, गळ्यात लाल दोरा आहे. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याबाबत अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहे