(गावखडी / वार्ताहर)
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात अनंत चर्तुर्थी दिवशी गावखडी येथील श्रीगणेश भक्तगणांनी निरोप देण्यात आला.
कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे. एरवी भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात, पण चतुर्थीला मात्र श्रीगणेशाची घरोघरी भाविक प्राणप्रतिष्ठापना करतात. काल दहा दिवसांच्या गणरायाची ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक गावखडी येथे काढण्यात आली. पाऊस नसल्यामुळे गणेश विसर्जनाला अडचण आली नाही. गावखडी समुद्रकिनाऱ्यावर “गणराया आम्हाला चांगले आरोग्य लाभो, आम्हाला सुखी ठेव, आमची भातशेती चांगली होऊ दे, पीक आमच्या हाती मिळू दे” असे साकडे लाडक्या गणरायाला भक्तांनी घातले.
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करीत गावखडीत गणरायाला सर्वांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला.