(मुंबई)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘लतांजली’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द गायक-गायिका, वादक कलाकार असे ५० कलावंत आणि सत्तर-ऐंशीच्या दशकात ज्या नायिकांना लता मंगेशकर यांचा आवाज लाभलेल्या अभिनेत्री राखी यांच्यापासून आताच्या पिढीतील काजोलपर्यंत १२ अभिनेत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
आपल्या आवाजाने प्रत्येक भारतीय रसिक मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी प्रथम स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ‘मेराक इव्हेंट’ यांच्या सहयोगाने ‘लतांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ६ फेब्रुवारी रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
प्रसिद्ध गायिका साधना सरगम, बेला शेंडे, शरयू दाते, संपदा गोस्वामी, निरुपमा डे आदी गायिका तर निवेदक म्हणून संदिप पंचवटकर, आर.जे.गौरव यांच्यासह नामवंत वादक असे एकुण ५० कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.विशेष बाब म्हणजे लता दीदींनी ज्या अभिनेत्रींना आवाज दिला त्यातील तब्बल १२ सुपरस्टार अभिनेत्रींची उपस्थिती हे सुध्दा या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. यामध्ये सिनेस्टार अभिनेत्री राखी, हेमा मालिनी, आशा पारेख, मौसमी चटर्जी, पद्ममीनी कोल्हापूरे, नितू सिंग, बिंदू, रिना राँय, पुनम ढिल्लो, रविना टंडन, राणी मुखर्जी आणि काजोल यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
या कार्यक्रमाला संगीतकार आनंदजी, प्यारेलाल ही ज्येष्ठ मंडळीसुद्धा उपस्थिती लावणार आहेत. रसिकांना हा कार्यक्रम विनामूल्य असून जाहीर होताच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्याची माहिती संयोजक मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांनी दिली. मुंबई पोलीस बँड तर्फे “लतांजली” कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहाच्या चौकात लतादीदींची काही निवडक गाणी वाजवून श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.