(संगलट /वार्ताहर)
चिपळूण येथील पोलिसांनी गांजा विक्री प्रकरणी सोमवारी अमर लटके याला पुन्हा अटक केल्याचे समोर आले आहे. विजय शांताराम राणे, अमीर उमर शेख, ओंकार सुभाष कराडकर या तिघांना गांजा विक्री प्रकरणी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पाग येथील अमर चंद्रकांत लटके याला सोमवारी दुपारी गांजा विक्रीप्रकरणी पुन्हा अटक केली आहे. या तिघांनी नाव सांगितल्यानुसार अमरवर ही कारवाई करण्यात आली आहे.
विरेश्वर कॉलनीलगत चालू असलेल्या व अर्धवट बांधकाम झालेल्या बिल्डीगच्या तिसऱ्या मजल्यावर दि. २५ ऑक्टोबर रोजी गांजा सेवन करणाऱ्या अजय कदम, अविनाश सावंत, अतुल सावंत, १७ वर्षाचा एक युवक अशा चार तरुणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी नाव सांगितल्यानुसार गांजा विक्रेता अमर चंद्रकांत लटके याला अटक करण्यात आली होती. त्याला जामीन झाला असला तरी पोलिसांची शोध मोहीम सुरुच होती.
पोलीस धरपकड व छापेमारी करीत असतानाच रविवारी दुपारी मुरादपूर भोईवाडी येथे विजय शांताराम राणे (२६,रा. मुरादपूर) याला त्याच्या घराच्या जवळच गांजाच्या पुडीसह अटक करण्यात आले. तर ओंकार सुभाष कराडकर (५६, रा. टेरव, कुंभार वाडी) याला गांजाच्या पुडीसह अटक करण्यात आली. नंतर अमीर उमर शेख (२३, रा. मुरादपूर, चिपळूण) यालाही अटक करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दोघांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सातत्याने ही सर्च मोहीम सुरु ठेवल्याने अनेक तरुणांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
दरम्यान, गांजा विक्रेत्यांचा बिमोड करण्याचा आपला प्रयत्न असून ही धरपकड मोहीम अशीच सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी सांगितले.