(मुंबई)
मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा १२ फेब्रुवारी पार पडला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. गळ्यात पट्टा घालून कुणाचीतरी गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला नाव न घेता लगावला.
उत्तर भारतीयांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी ते म्हणाले, मुस्लिमांचा द्वेष करा, असं बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नाही. गळ्यात पट्टा घालून कुणाचीतरी गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही. तोडा आणि फोडा, असं राजकारण आम्हाला करता येत नाही. आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदुत्वाची साथ कायम आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यात आम्हीच लक्ष घातलं- ठाकरे राम मंदिराचा मुद्दा खितपत पडला होता, परंतु आम्ही भूमिका घेतली. हवं तर स्वतंत्र कायदा करा. परंतु राम मंदिराचा प्रश्न सोडवा,अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मी अयोध्येत जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथली माती प्रभू रामाकडे नेली होती, नंतर मी मुख्यमंत्री झालो आणि राम मंदिरही उभं राहात आहे. आम्ही महाराष्ट्रात राम-राम म्हणतो आणि तुमच्याकडे जय श्रीराम म्हणतात. शेवटी राम आहेच ‘राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे’ असं बाळासाहेब म्हणायचे. हेच आमचे संस्कार आहेत, असे ते बोलताना म्हणाले.