(खेड / इक्बाल जमादार)
सांगली, येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या वृद्धेस जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले. अनघा अनंत जोशी (वय ६१, बसेरा शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. एकूण ७ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयित महिलेकडून शहरातील सात व शिरोळमधील एक असे आठ गुन्हे उघडकीस आले.
पोलिसांनी माहिती दिली, की येथील बसस्थानक परिसरात प्रवाशी महिलांचे दागिने चोरीला जात होते. संशयितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अजित टिके, अशोक वीरकर यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली खास पथके तयार केले होते. पथकातील पोलिस बसस्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील संशयितांची माहिती घेत होते. एक सुशिक्षीत वयस्क महिला गर्दीचा फायदा घेऊन चोरी करून जात असल्याचे समोर आले.
त्यानुसार पथकाने जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, शाहूवाडी, शिरोळ, मलकापूर, साखरपा, रत्नागिरी या ठिकाणी चोरट्या महिलांची माहिती घेतली. त्यावेळी संशयित महिलेची माहिती मिळाली. चोरीनंतर पुन्हा रत्नागिरीला ही महिला जात असल्याचे दिसले. त्यानुसार देवरूख येथे ही संशयित येणार असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून संशयित अनघा जोशीस ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता तिच्याकडे दागिने व रोकड असा सात लाख ३१ हजारांचा मुद्देमाल मिळून आला.
दरम्यान, बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेवून चोरी केल्याची कबुली संशयित महिलेने दिली आहे. ही संशयित वृद्ध महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून लांजा, देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
उपनिरीक्षक विजय सुतार, सहायक फौजदार दिलीप जाधव, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, स्वप्ना गराडे, झाकीरहुसेन काझी, डॅनियल घाडगे, अभिजीत माळकर, अमित मोरे, अक्षय कांबळे यांचा कारवाईत सहभाग होता.