(संगमेश्वर / प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर या पवित्र भूमीत शिक्षणाच्या कार्याला सुरुवात करून, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करणाऱ्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत पदवी वितरण कार्यक्रमानिमित्त येणे हे मी माझे भाग्य समजतो. शिक्षण संस्था उभारणे व ते चालवण्याचे आव्हान नवनिर्माण संस्थेने स्वीकारले आहे, हे अतिशय स्तुत्य आहे असे प्रतिपादन लेखक आणि प्राचार्य डॉ दिनकर पाटील यांनी व्यक्त केले.
नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर येथे पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्य संजना चव्हाण, प्रज्ञा कदम, अजिंक्य पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये म्हणाले की, तरुणांच्या धडपडीला आकार देण्यासाठी नवनिर्माण काम करीत आहे. पदवी घेताना अनेक आव्हाने पुढे उभी राहीली आहेत.त्यांना पार करण्यासाठी तरुणांनी पदवी बरोबर नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.नवीन आधुनिक उपकरणे तरुणांना प्रदूषित करीत आहेत त्यांच्यापासून बाजूला आणि सावध राहायला पाहिजे.
शैक्षणिक क्षेत्राची नवीन दालने उभी राहतील.कृत्रिम क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कौशल्य आवश्यक असून एका बाजूला रोजगार नाही तर दुसऱ्या बाजूला कौशल्य पूर्ण कारागीर नाही. कितीही माणसे मोठी झाली तरी भाषेची शब्दफेक करायला कला शाखेचीच माणसे लागणार आहेत. शारीरिक क्षमतेला माणसे यापुढे कमी पडणार असल्याचे संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष खरे आणि आभार अनिल नेमन यांनी मानले.