(मुंबई)
गरीब आणि दारिद्य रेषेखालील रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये काही टक्के मोफत उपचार करण्याचा आदेश विधानसभेत दिला आहे. त्यामुळे जी रुग्णालये या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
विधिमंडळाने सर्वसामान्यांना खासगी किंवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर उपचार करण्याचा आदेश दिला आहे, जर त्यांना या सुविधा नाकारल्या जात असतील, तर तो विधीमंडळाचा अपमान समजला जाईल, त्यामुळे संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई किंवा विधिमंडळाचा हक्कभंग समजला जाईल. तसेच रुग्णांना रुग्णालयातील मोफत उपचारासाठीच्या खाटांची माहिती व्हावी यासाठी लवकरच ऍप सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
काही रुग्णालये गरीब रुग्णावर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत किंवा त्यांना उपचार देण्यास नाकारत आहेत, अशी तक्रार विधिमंडळातील सदस्यांनी अनेकदा केली होती. त्यामुळे आम्ही याविषयी बैठक घेऊन उपरोक्त निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे अनिवार्य ठरणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.