अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून लैंगिक शोषण करणाऱ्या गुरदास बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भोंदू बाबा फरार झाला आहे.
गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर प्रसिद्धीस आला होता. परंतु याच बाबावर आता बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेचा गैरफायदा घेऊन तिचे शोषण केल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथे बाबाचा आश्रम आहे. गुरुदासबाबा म्हणून ओळख असलेल्या बाबाचे नाव सुनील कावलकरवर असे आहे. या गावात बाबाचे आश्रम असून याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून दरबार भरतो. बाबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरबारात येत असतात.गुरुवार, शनिवार आणि अमावस्या, पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर बाबाचा दरबार भरतो.
आपल्या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी लोक या बाबाच्या आश्रमात येत असतात. दरम्यान, अशीच एक समस्या घेऊन मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी महिला बाबाच्या आश्रमात आली. परंतु गुरुदास बाबाने महिलेला आश्रमात बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि अश्लील व्हिडीओ देखील काढला, असा आरोप या पीडित महिलेने केला आहे. जबलपूर येथील एक महिला आपल्या पतीचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी व कौटुंबिक कलहाला कंटाळून गुरुदासबाबाच्या आश्रमात आली होती.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात ती एका मैत्रिणीच्या मदतीने आश्रमात आली होती. या भोंदूबाबाने तिला अंगारा आणि प्रसाद देऊन तो जबलपूरला आल्यावर भेटायला बोलावले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला व तिला एकटीला बोलावून घेतले. त्यानंतर तिला त्याने सांगितले की, पाच सहा महिने आश्रमात रहावे लागेल व ती यासाठी तयार झाली. यावेळी या महिलेचा गैरफायदा घेऊन तिचे शोषण केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान भोंदूबाबाने तिला अंगारा खायला देऊन तिच्यावर तीन महिने अत्याचार केले. तसेच पती सुधारला नसल्यास मीच तुझ्याशी लग्न करण्यार असल्याचे आमिष दाखवले. पीडितेने आरोप केला की, भोंदुबाबाच्या मोबाईलमध्ये तिचे अश्लील व्हिडिओ आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला बाबाने तिला नागपूरमध्ये सोडले. मे २०२३ ते २ जानेवारी २०२४ पर्यंत ती आश्रमात होती. मात्र तिच्या कुटूंबात काहीच चांगले न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिला कळले.
या प्रकरणी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार गुरुदास बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.