(मुंबई)
बाप-लेकाचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मुंबईजवळच्या विरार शहरात घडली आहे. सोसायटीत गरबा खेळताना अस्वस्थ वाटू लागलेल्या ३५ वर्षीय आपल्या मुलाला ६५ वर्षीय पिता रिक्षाने रुग्णालयात नेत होता.
मुलगा हॉस्पिटल परिसरात जात असताना अचानक कोसळल्याचे पाहून बापाला मानसिक धक्का बसला व त्यातच त्यांना कार्डिअॅक स्ट्रोक आला आणि त्यानी प्राण सोडले, तर हॉस्पिटलमध्ये मुलालाही मृत घोषित करण्यात आले. मनिषकुमार जैन व त्यांचे वडील नरपत जैन मृत्युमुखी पडले.
पालघर जिल्ह्यात येणाऱ्या विरार पश्चिमेच्या अगरवाल कॉम्प्लेक्समधील एव्हरशाईन अव्हेन्यू इमारतीच्या कम्पाऊण्डमध्ये शनिवारी रात्री गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इमिटेशन ज्वेलरी व्यावसायिक मनिषकुमार जैन गरबा खेळत होता. अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी परतला, तेथेच त्याला उलटी झाली.
वडील नरपत जैन आणि मोठा भाऊ राहुल यांनी मनिषकुमारला रिक्षात बसवून विरारमधल्याच संजीवनी हॉस्पिटलला नेलं. राहुल हा आपला भाऊ मनिषला घेऊन आपत्कालीन विभागाकडे चालत जात होता, तर वडील रिक्षावाल्याला भाड्याचे पैसे देत होते. हॉस्पिटलच्या मेडिकल काऊण्टरजवळ येताच मनिष अचानक कोसळला, हे पाहून राहुल मोठ्याने ओरडला. राहुलची किंकाळी ऐकून रिक्षाजवळ असलेल्या नरपत यांना कार्डिअॅक स्ट्रोक आला व त्यात त्यांचा मृत्यु झाला. तर हॉस्पिटलमध्ये नेल्यावर मनिषकुमारलाही मृत घोषित करण्यात आले.