(मुंबई)
सार्वजनिक गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना दिलासा देणारा आणखी एक दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे. गणेशोत्सवात आणि दहीहंडी उत्सव काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्हे लवकरच मागे घेतले जातील, अशी घोषणा सरकारने केली आहे. तर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात येणार असून गुन्ह्याचे स्वरुप पाहून गुन्हा मागे घेण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात आणि दहीहंडी उत्सव काळात दाखल गुन्ह्यांचे स्वरूप तपासण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा स्तरावर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून यामाध्यमातून निर्णय घेतले जातील. या समितीमार्फत केवळ गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. पाच लाखांपेक्षा कमी नुकसान केलेल्या खटल्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे. सरकारकडून याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला असून 31 मार्च 2022 पूर्वी दोषारोपपत्र दाखल झालेल्या खटल्यांसाठी हा निर्णय लागू असेल असं त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
गोविंदांचा थर लावताना अपघात झाल्यास सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या नव्या घोषणेनुसार, थर लावताना एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारशाला 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. जर थर लावताना पडल्यास दोन्ही डोळे, दोन्ही हात आणि दोन्ही पाय अथवा महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास त्याला साडे सात लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल. राज्य सरकारचा हा आदेश या वर्षीसाठी लागू असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.