(मुंबई)
गौरीगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी वसई, विरार अन् पालघरमधून राज्य परिवहन विभागाच्या आजपासून १८ सप्टेंबर पर्यंत तब्बल ६०२ बसगाड्या कोकणातील विविध गावे व तालुक्यांच्या ठिकाणी सोडणार येणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळीही १५ एसटी बस रवाना करण्यात आल्याचे एस.टी प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालघर विभागातर्फे १६, १७ आणि १८ सप्टेंबरपासून सलग तीन दिवस या बस सोडण्यात येणार आहेत.
राज्य परिवहन विभागाच्या पालघर विभाग नियंत्रण कार्यालया अंतर्गत असलेल्या मनवेल पाडा बस स्थानक येथून ३२०, तर नालासोपारा बस स्थानकातून २५० बस रवाना होणार आहेत. आज, १६ सप्टेंबर रोजी ४४६, १७ सप्टेंबर रोजी ९५ आणि १८ सप्टेंबर रोजी ४० बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत.
कोकणातील गुहागरसाठी २००, राजापूर ४०, साखरपा १०, श्रीवर्धन ३०, रत्नागिरी १९, खेड २०, तसेच बिलवली, आंबेवडे, म्हसळा, केळशी, वीरसई, कुडाळ, आंजर्ले, खुटील, बोलवडी, निगडी, खरवते, कासे मारवजण या ठिकाणी साधारण प्रत्येकी एक ते तीन बसगाड्या या तीन दिवसांत सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याचा फायदा घेऊन राज्य परिवहन विभागाच्या बसने सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन एस.टी प्रशासनाने केले आहे.