(रत्नागिरी)
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेमार्गावरील भाविकांची गर्दी जास्त असल्याने आणि गेल्या दोन महिन्यांत मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देता संचालक संजय गुप्ता यांनी सुरक्षेसाठी जादा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
वहाळकर यांनी सुरक्षेकरिता कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. आगामी गणेशोत्सवात कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेच्या नियमित गाड्या तसेच सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वेमधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमधे वाढ झालेली दिसून येते. कोकण रेल्वे महामंडळ असल्याने मुळातच कोकण रेल्वेवरील रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. वाढलेल्या गाड्या, प्रवासीसंख्या यांच्या तुलनेत ही संख्या तोकडी असल्याने रेल्वेमधील पेट्रोलिंग तसेच स्थानकांवरील सुरक्षा यात मर्यादित संख्येमुळे अडचणी येतात.
राखीव गटातून सुरक्षा कर्मचारी
गणेशोत्सवात रेल्वेमार्गावर रेल्वे सुरक्षा बलांच्या राखीव गटातून अधिक प्रमाणात आवश्यक असलेल्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल, असे कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांनी सचिन वहाळकर यांना कळवले आहे. यामुळे पुरेसे रेल्वे सुरक्षा बल गर्दीच्या दिवसात उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासी सुरक्षेतही वाढ होणार आहे.