(मुंबई)
यंदा गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या साेयीसाठी मध्य रेल्वेने आखणी ५२ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यामध्ये दिवा-चिपळूण दरम्यान ३६ मेमू स्पेशल आणि मुंबई-मंगळुरू दरम्यान १६ स्पेशल गाड्यांचा समावेश आहे. याआधी मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी १५६ गणपती विशेष रेल्वे गाड्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांची २०८ वर पोहचली आहे. या ५२ नवीन ट्रेनचे तिकीट आरक्षण आज ३ जुलैपासून सुरू झाले आहे.
मध्य रेल्वे विभागाने सांगितले की,दिवा-चिपळूण मेमू विशेष ३६ सेवा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११५५ मेमू दिवा येथून १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी १.२५ वाजता चिपळूणला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५६ मेमू चिपळूण येथून १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता दिवा येथे पोहोचेल. या गाड्यांना पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक,खेड आणि अंजनी येथे थांबा देण्यात आला आहे.
मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष गाडीच्या १६ सेवा चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०११६५ स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ ते १८ सप्टेंबर, २२ ते २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन सायंकाळी ५.२० वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.तसेच ट्रेन क्रमांक ०११६६ स्पेशल मंगळुरु जंक्शन १६ ते १९ सप्टेंबर, २३-२४ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला दुपारी १.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
या गाड्यांना ठाणे,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार,गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर याठिकाणी थांबे आहेत. सोमवारपासून या विशेष गाड्याचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू झाले आहे.