(मुंबई)
सध्या ब-याच भागात पावसाने उसंत घेतल्याने पंख्यांसह विजेच्या यंत्राचा वाढलेला वापर तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक घरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे पुन्हा वीज वापर वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी राज्यात विजेची मागणी २० हजार ९२३ मेगावॅट इतकी नोंदवली गेली.
महानिर्मितीच्या ‘स्टेट लोड डिस्पॅच सेंटर’च्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाला राज्यात विजेची मागणी २० हजार ९२३ मेगावॉट होती. त्यातील ११ हजार ७८५ ‘मेगावॉट’ची निर्मिती राज्यात होत होती, तर केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९ हजार १३८ ‘मेगावॉट’ मिळत होते. राज्यात निर्मित होणा-या विजेपैकी सर्वाधिक ५ हजार ११२ ‘मेगावॉट’चे उत्पादन महानिर्मितीच्या विविध कोळसा, जलविद्युत, गॅस, सौर ऊर्जा प्रकल्पातून होत होते, तर अदानी, जिंदाल, आयडियल, रतन इंडियासह इतर खासगी कंपन्यांकडून ५ हजार ४६३ मेगावॉट वीज मिळत होती.
वीजवापर आणखी वाढणार
१२ जुलै २०२२ रोजी राज्यात विजेची मागणी १७ हजार ५०६ ‘मेगावॉट होती. त्यातील ४ हजार ८०७ मेगावॉट विजेचे उत्पादन महानिर्मितीच्या विविध कोळसा, जलविद्युत आणि गॅस प्रकल्पातून केले जात होते. तर इतर वीज केंद्राच्या वाट्यासह इतर स्त्रोतांकडून घेतली गेली. गणेशोत्सवामुळे बुधवारी अनेक घरात रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. हा विजेचा वापर पुढे आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.