देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या सणात वेगळेच दृश्य पाहायला मिळते. सिद्धिविनायकपासून खजरानपर्यंत देशभरातील बाप्पाच्या मंदिरांमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या सर्व मंदिरांमध्ये गणपतीच्या मूर्तीला सोंड आहे, पण भारतात एकच गणेश मंदिर आहे, जिथे गणेशाची मूर्ती मानवी रूपात आहे. एरवी बाप्पांचे रूप सर्वांना गजानन म्हणून परिचित आहे. त्यामुळे ही मानवी रूपातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
गणेशाचे हे मंदिर तामिळनाडूमध्ये आहे. या मंदिराचे नाव आदिविनायक आहे, जिथे गणपतीच्या मानवी रूपाची पूजा केली जाते. विशेष म्हणजे, ही मूर्ती जगात फक्त आदिविनायक मंदिरातच आढळते. या मंदिरात बाप्पाच्या अंगाला गजमुख नसून, मानवी चेहरा आहे.
असे मानले जाते की, जेव्हा भगवान शंकर गणेशावर कोपले, तेव्हा त्यांनी गणेशाचे डोके त्याच्या शरीरापासून विलग केले. त्यानंतर श्रीगणेशाच्या धडावर हत्तीचे डोके ठेवण्यात आले. पण इथे बाप्पाच्या मूळ मानवी रूपाची पूजा केली जाते. या मंदिराला आदिविनायक असेही नाव पडले; कारण येथे आदि अर्थात् गणपतीच्या पहिल्या रूपाची पूजा केली जाते. हे मंदिर तिरुवरूर जिल्ह्यातील कुटनूरपासून सुमारे तीन किमी अंतरावर टिल्लाथरपण पुरी नावाच्या ठिकाणी आहे. या मंदिरात तुम्ही विमानानेही जाऊ शकता. मंदिरापासून जवळचे विमानतळ तिरुचिरापल्ली आहे, जे सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे. येथे ट्रेनने जायचे असेल तर चेन्नईला पोहोचल्यानंतर तिरुवरूरला जावे लागेल.