आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे गावामध्ये ग्रामकृती व वाडीकृती दलाच्या बैठकीत 30 एप्रिलपर्यंत कडक टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रविवारपासून सकाळी 6 वाजता टाळेबंदी सुरू होईल व 30 एप्रिलला रात्री 9 वाजता ती संपेल.
गणपतीपुळ्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलले आहे. टाळेबंदीच्या काळात वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, विनाकारण व विनामास्क फिरणार्यांकडून 500 रुपये दंड आकारला जाईल. गावाबाहेरील व्यक्तींना आठ दिवसाच्या कालावधीत प्रवेश दिला जाणार नाही. आपटा तिठा, श्री चंडिकादेवी मंदिर व मानेवाडी नवी विहीर येथे तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. सर्व प्रकारची बांधकामे बंद ठेवण्यात येणार आहेत.
टाळेबंदीच्या काळात ग्रामस्थांना दूध, भाजीपाला किंवा अत्यावश्यक वस्तू लागल्यास त्या आणून देण्याची जबाबदारी त्या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यावर सोपवण्यात आली आहे. दुकानदारांनाही घरपोच सेवेसाठी प्राधान्य द्या, अशा सूचना दिल्या आहेत. हे काम करणार्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.