( गणपतीपुळे/वैभव पवार )
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू “श्रीं” च्या मंदिरात संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या वतीने 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या वतीने माघी गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम अतिशय नेटक्या नियोजनात व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यात आले. यावेळी तब्बल दोन वर्षांनंतर झालेल्या दिड दिवसाच्या माघी यात्रोत्सवाची सांगता शनिवारी दुपारी मोठ्या उत्साहात करण्यात आली.
येथील गणपती मंदिरात माघी गणेशोत्सवाला २ फेब्रुवारी रोजी श्रीं च्या महापूजेने सुरुवात झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये दररोज सामुदायिक आरती व मंत्रपुष्प व तसेच डोंबिवली येथील ह.भ.प. वैभव ओक यांचे सुश्राव्य किर्तन, गणेश देवता स्थापना, कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहुती, गणेश जयंती निमित्त श्रींच्या चरणी मोदक समर्पण तसेच सायंकाळी प्रदक्षिणा मार्गे श्रींची वाजत गाजत पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात संस्थांनच्या वतीने काढण्यात आली. त्यानंतर शनिवारी रात्री ललिताच्या कीर्तनाने या माघी गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. तर दीड दिवसाच्या माघी यात्रेला गणपतीपुळे नजीकच्या मालगुंड, वरवडे, निवेंडी, भगवतीनगर भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, जाकादेवी, खंडाळा आदी भागातील स्थानिक भाविकांबरोबरच संपूर्ण रत्नागिरी तालुक्यासह जिल्हाभरातील स्थानिक भाविकांनी येऊन “श्रीं” च्या दर्शनाबरोबरच यात्रा उत्सवाचा मोठा मनमुराद आनंद लुटला.
त्याचबरोबर गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद लुटताना समुद्रस्नानाचा ही आनंद स्थानिक भाविकांनी घेतला. या यात्रेसाठी घाटमाथ्यावरून ही काही भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. ही माघी यात्रा स्थानिकांची यात्रा म्हणून ओळखली जाते. परंतु या गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या टाळेबंदीमुळे माघी यात्रोत्सव झालेला नव्हता. त्यामुळे स्थानिक भाविकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात असताना यंदा माघी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात स्थानिक दुकानदार व घाटमाथ्यावरील दुकानदारांनी थाटलेल्या विविध वस्तूंच्या स्वरूपात पार पडला. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या सर्वच भाविकांनी आपल्या आवडत्या विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटून माघी यात्रा उत्सवाचा तब्बल दोन वर्षांनी आनंद घेतला. या दीड दिवसाच्या माघी यात्रेची सांगता शनिवारी दुपारी शांततेत करण्यात आली.