(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे आज बुधवार दिनांक 25 जानेवारी रोजी माघी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. दरवर्षी येणारी “माघी यात्रा” ही स्थानिक भाविकांची म्हणून ओळखली जाते. परंतु मागील दोन वर्षाच्या कोरोना टाळेबंदीमुळे माघी यात्रा उत्सव होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे यंदा माघी यात्रोत्सव होणार असल्याने सर्वच ठिकाणच्या स्थानिक भविकांमध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्याचे व आनंदाचे वातावरण होते.
या पालखी मिरवणुकीत संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच विनायक राऊत यांचेसह सर्व पंचमंडळी, मुख्य पुजारी, देवस्थानचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या माघी यात्रेच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीच्यावतीने स्वयंभू गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा माघी गणेशोत्सव देखील विविध धार्मिक कार्यक्रमानी मोठया भक्तीभावाने पार पाडला जात आहे. या या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद स्थानिक भाविकांबरोबरच विविध ठिकानाहून आलेल्या भाविक व पर्यटकानी घेतल्याचे दिसून आले आहे.
एकूणच माघी यात्रा उत्सवासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलीस यंत्रणेच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आल्याने हा यात्रोत्सव अतिशय शांततेत पार पडला. तसेच मंदिर परिसरात स्थानिक भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने आरोग्य पथक मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तैनात करण्यात आले होते. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय पथकाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.