(वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिरात शनिवार दि.12 मार्चपासून दुपार व रात्रीच्या सत्रात महाप्रसादाला सुरुवात झाली आहे. कोरोना टाळेबंदीनंतर स्वयंभू श्री गणेश मंदिर गेल्या ऑक्टोबर महिन्यातील घटस्थापनेच्या शुभदिनी सुरू झाल्यानंतर देशाच्या विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना स्वयंभू श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळाला. त्यानंतर संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे कोरोना प्रादुर्भावातील शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून भाविकांना दर्शनाची सुलभ सोय करताना आपल्या देवस्थानमधील विविध उपक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्णय घेतले.
त्यामध्ये सुरुवातीला भाविकांचा खास आवडीचा असलेला बुंदी लाडू प्रसाद मंदिर देवस्थान समितीने सुरू केल्यानंतर आता भाविकांच्या आवडीचा असलेला खिचडी व पुलाव महाप्रसाद शनिवारपासून सुरू केला आहे. एकूणच विविध ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांना आता गणपतीपुळे मंदिरात असलेल्या महाप्रसादाचा लाभ तब्बल दोन वर्षांनी घेण्याचा लाभ मिळू लागला आहे. त्यामुळे “भुकेलेल्याला व तहानलेल्या एखाद्या सुखाचा घास” आता श्रींच्या मंदिरातील महाप्रसादाने मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महाप्रसाद म्हणून दुपार सत्रात खिचडी व सायंकाळच्या सत्रात पुलाव भात देवस्थान समितीने सुरू केला आहे. हा महाप्रसाद सुरू झाल्यामुळे येणाऱ्या सर्वच भाविकांमधून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे. देवस्थान समितीच्या स्तुत्य निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
एकूणच शनिवारी सुरू झालेल्या महाप्रसादाचा दुपारी १२ ते २ या वेळेत पंधराशे भाविकांनी तर सायंकाळी ७.१५ ते ८.३० या वेळेत पुलाव भात महाप्रसादाचा सुमारे 900 भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती देवस्थान कार्यालयाकडून प्राप्त झाली. एकूणच रविवारी देखील सुट्टी असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती तसेच या दिवशी दोन्ही सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ अतिशय मोठ्या संख्येने घेतल्याची माहिती देवस्थान कार्यालयाकडून प्राप्त झाली.