(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील मोरया चौकातील पिकअपशेडचे छप्पर सध्याच्या पावसाळ्यात उडाले असून इतर गंजलेले पत्रे खाली पडण्याच्या स्थितीत आहे. तसेच संबंधित पिकअप शेड गेल्या काही वर्षांपासून वापराविना पडून आहे.
याबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही वर्षांपूर्वी बाराव्या वित्त आयोगातील सुमारे दोन कोटींच्या विविध कामांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांपैकी पिकअपशेडचे काम करण्यात आले. गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाच्या ( एमटीडीसी) मुख्य गेटसमोर सर्वे नंबर ५/ १० मध्ये एसटी महामंडळाचा प्रवासी थांबा (पिकअपशेड) बांधण्यात आली. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात एसटी महामंडळाच्या गाड्यांनी येणाऱ्या भक्त व पर्यटकांना गणपती मंदिराजवळ उतरता यावे या दृष्टीने ही पिकअप शेड बांधण्यात आली आहे. परंतु आजतागायत ही पिकअप शेड वापरात आलेली नाही मात्र गेली अनेक वर्षे वापराविना धूळ खात केवळ शोभेची बाहुली म्हणून उभी आहे. या पिकअप शेडची सध्या मोठी दुरावस्था झाली असून पूर्णतः छप्पर उडाले आहे. तसेच गंजून पत्र सडलेले असल्याने काही पत्रे खाली पडले आहे. तर शिल्लक पत्रे पूर्णपणे खाली पडण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र दिसून येते. तसेच गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मोरया चौकातच या पिकअपशेडची भकास दुरावस्था दिसून येत असल्याने अनेक भक्त व पपर्यटकांमधून येथील विकासकामांबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जाते. तसेच अद्याप एमटीडीसी व स्थानिक प्रशासनाकडून या पिकअपशेडच्या दुरावस्थेकडे पाहिले जात नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. त्याशिवाय ही पिकअपशेड जमीनदोस्त करून या ठिकाणी अन्य सोयी सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात कुठलीही हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या या पिकअपशेडच्या मागील बाजूस भक्त पर्यटकांसाठी पार्किंगची व्यवस्था असल्याने अनेक गाड्या या ठिकाणी व पिकअपशेडच्या समोरच लावल्या जातात. तसेच पिकअपशेडच्या समोरच स्थानिक रिक्षा व्यावसायिकांचे रिक्षा स्टॅन्ड आहे. या रिक्षाचालक व्यावसायिकांकडून पिकअपशेडचा वापर बसण्यासाठी केला जातो. तसेच अनेक पर्यटक ही विश्रांतीसाठी पिकअपशेडमध्ये बसलेले दिसून येतात. त्यामुळे अशा भक्त- पर्यटकांवर पिकअपशेडच्या छप्परचा गंजलेला एखादा पत्रा पडून जखमी झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे.
एकूणच, पिकअपशेडच्या याच दुरावस्थेकडे सध्या शिवसेना (ठाकरे गट)चे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, गणपतीपुळेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे, उमेश भणसारी आदींनी लक्ष घातले असून ही वापराविना असलेली पिकअपशेड जमीनदोस्त करून या ठिकाणी अन्य सोयी सुविधा उपलब्ध न केल्यास तीव्र आंदोलन छेडेल जाईल, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.