(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील दानशूर व्यक्तीमत्व तथा नामांकित व्यावसायिक अरुण रामचंद्र काळोखे यांनी गणपतीपुळे मानेवाडी येथील लहान मुलांसाठी अंगणवाडीची स्वतंत्र कायमस्वरूपी इमारत असावी, या मंगल भावनेतून आपली पत्नी कैलासवासी सुवर्णा अरुण काळोखे यांच्या स्मरणार्थ आपल्या राहत्या घराच्या परिसरातील विना मोबदला जमीन देऊन व स्वतः स्वखर्चाने अंगणवाडीची इमारत बांधून दिल्याने या इमारतीचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण नुकतेच गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्ये यांच्या अनुपस्थितीत गणपतीपुळेचे उपसरपंच महेश केदार यांच्या हस्ते करण्यात आले.
गणपतीपुळे मानेवाडी येथे ग्रामपंचायत गणपतीपुळे इमारत क्रमांक १६७ (३) कैलासवासी सुवर्णा अरुण काळोखे यांच्या स्मरणार्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी अंतर्गत अंगणवाडी गणपतीपुळे मानेवाडी केंद्र क्रमांक १० असे या नवीन अंगणवाडीचे नामकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे मानेवाडी येथे असलेल्या लहान मुलांसाठी अंगणवाडीची जागा उपलब्ध होत नव्हती.
यापूर्वी येथील अंगणवाडी प्राचीन कोकण शेजारी राहणाऱ्या नरहर केशव भिडे( खोत) यांच्या जागेत होती. परंतु सदर जमीन हस्तांतरित झाल्यावर जमिनीचे मालक श्री. बापट यांनी सदर जागा खाली करण्यास सांगितले. त्यानंतर गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या एका खोलीमध्ये मानेवाडी येथील मुलांसाठी अंगणवाडी चालत होती. मात्र त्यानंतर गणपतीपुळे ग्रामपंचायतीने जागा कोणी उपलब्ध करीत असेल तर संपर्क करा ,अशी नोटीस काढल्यानंतर गणपतीपुळे येथील ग्रामस्थ श्री. चंद्रकांत गावणकर आणि गणपतीपुळेचे माजी सरपंच तथा मानेवाडी येथील ग्रामस्थ बाबाराम माने यांनी दानशूर व्यक्तीमत्व अरुण काळोखे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अंगणवाडीसाठी जमीन देण्याबाबत चर्चा केली.
यावेळी अरुण काळोखे यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीची नोटीस वाचून मोठ्या दातृत्व भावनेने अंगणवाडीसाठी आपल्या राहत्या घराच्या परिसरातील सर्व्हे नंबर १९ हिस्सा नंबर १०/ ब पैकी इमारत क्र.६७/३ ही सव्वा गुंठे जमीन विनामोबदला देऊन व स्वतः स्वखर्चाने अंगणवाडीची इमारत बांधून देऊन आपली कैलासवासी पत्नी सुवर्णा अरुण काळोखे यांच्या स्मरणार्थ गणपतीपुळे ग्रामपंचायतीला बक्षिसपत्राने दिली आहे.या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी गणपतीपुळे महेश केदार यांचे समवेत ग्रामसेवक प्रवीण चौधरी, सर्व ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी तसेच गणपतीपुळेचे माजी सरपंच बाबाराम माने, अशोक काळोखे, महेश ठावरे , दिलीप केळकर आदी मान्यवर व गणपतीपुळे मानेवाडी येथील सर्व पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गणपतीपुळे मानेवाडी येथील अंगणवाडी सेविका दिपिका दीपक गावणकर मदतनीस स्नेहा संतोष गोताड, गणपतीपुळे केदारवाडी येथील अंगणवाडी सेविका शुभांगी केदार, मदतनीस शुभांगी पाचकुडवे आदींसह गणपतीपुळे शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता जोशी, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत गावणकर,प्रभाकर माईन,रवींद्र माने ,जयवंत आग्रे ,विनायक गावणकर आदींसह महिला भगिनीं उपस्थित होत्या .तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून कोल्हापूरचे संग्राम सरनाईक , हिंदकेसरी दादू चौगुले यांचे नातू श्रीयुत चौगुले, रत्नागिरीचे व्यवसायिक मंगेश मोहन गांधी व अन्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दानशूर व्यक्तीमत्व अरुण काळोखे यांनी स्वतः विनामोबदला जमीन देऊन व अंगणवाडी इमारत स्वखर्चाने बांधून दिल्याबद्दल गणपतीपुळे मानेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने व गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच महेश केदार यांच्या हस्ते अरुण काळोखे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे खास अभिनंदन व कौतुक केले आहे. गणपतीपुळे मानेवाडी येथे ही नवीन इमारत बांधून दिल्याबद्दल गणपतीपुळे मानेवाडी येथील लहान मुलांची अंगणवाडीमध्ये जाण्याची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
सध्या या अंगणवाडीमध्ये एकूण 24 बालक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अरूण काळोखे यांनी आपले खूप मोठे दातृत्व दाखवून गणपतीपुळे मानेवाडी येथील लहान मुलांसाठी जागा व इमारत बांधून दिल्याबद्दल गणपतीपुळे मानेवाडी येथील सर्व ग्रामस्थ, पालक व समस्त गणपतीपुळेवासियांकडून समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.