(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर लाकडी वस्तूंचे अनोखे संग्रहालय साकारले आहे. आईस्क्रीमच्या काड्यांचा योग्य वापर करून त्यापासून विविध कलाकृती साकारणारा अवलिया वरवडे खारवीवाडा येथे राहतो. या अवलियाचे नाव आहे प्रभाकर गिरीधर डोरलेकर.
वयाच्या 52 वर्षी त्यांनी आपल्या लाकडी वस्तूंच्या संग्रहालयाचे स्वप्न साकार करताना गणपतीपुळ्याच्या स्वयंभू श्रींचे मंदिर, ताजमहाल, विविध मंदिरे मुंबई महानगरपालिकेची इमारत अशा प्रतिकृती साकारल्या आहेत. तसेच नव्याने गणपतीपुळे किनाऱ्यावर आकर्षक बोटीत लाकडी कलाकृतींचे संग्रहालय साकारल्याने हे संग्रहालय पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक भाविक येऊ लागले आहेत.
प्रभाकर डोरलेकर हे वयाच्या 17 वर्षापासून मच्छीमारी व्यवसाय करत होते तेव्हापासून ते आपल्या फावल्यावेळेत विविध प्रकारच्या वस्तू बनवत. त्यामध्ये सराव झाल्यानंतर मोठ्या कलाकृती करायला त्यांनी सुरुवात केली. कलेची आवड असलेल्या डोरलेकर यांनी आजवर शेकडो प्रतिकृती बनवल्या आहेत. अनेक वर्षे ते ही कला जपत आहेत. अलीकडेच त्यांनी बोटीमध्ये सौराज वुड आर्ट संग्रहालय साकारले आहे. पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट सुद्धा केला आहे शिवाय या बोटीवर वाढदिवस पार्टी सुद्धा करता येऊ शकते .गणपतीपुळे येथे अनेक सहली सध्या येत आहेत. हे संग्रहालय पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहलींमधील मुलांना संग्रहालय आकर्षित करू लागले आहे.
वरवडे खारवीवाडा येथील रहिवासी असलेल्या डोरलेकर या कलाकाराने गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर सौराज शिप वुडन आर्ट म्युझियम या नावाने आपल्या कलाकृतींचे संग्रहालय बोटीत उभे केले आहे.गेली १९ वर्षे ते ही कला जपत आहेत. यामध्ये एकूण तीस कलाकृती साकारल्या आहेत. गणपतीपुळे येथे अनेक पर्यटक येत असल्याने त्यांना या कलाकृती पाहता याव्यात यासाठी बोटीमध्येच म्युझियम साकारण्याची संकल्पना त्यांना सुचली. तसेच त्यांनी तात्काळ ती अंमलात ही आणली.यावेळी पत्नी सौ. प्राजक्ता हिने कलाकृतींच्या वस्तू बनवण्यासाठी भरपूर सहकार्य केले असल्याचे प्रभाकर डोरलेकर यांनी सांगितले. आता गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर सुरू केलेले संग्रहालय मुलगा सौराज व जॉन हे सांभाळतात. तसेच गणपतीपुळे येथील एमटीडीसीचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर हजारो पर्यटक येतात. त्यांच्यासाठी बोटीतले वस्तू संग्रहालय साकारले आहे. मी बनविलेल्या सर्व वस्तू एकत्र आणून त्यांचे संग्रहालय करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. 40 बाय10 फुटांच्या बोटीत हे संग्रहालय बनवले आहे. या नव्या संग्रहालयामुळे गणपतीपुळे पर्यटनाला नवा साज चढला असून पर्यटकांना आणखी वेगळ्या कला कृतीचा आनंद गणपतीपुळे पर्यटनस्थळी घेता येणार आहे.
– प्रभाकर डोर्लेकर