(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जगप्रसिद्ध असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रामधील गणेश मंदिरात मंगळवारी गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी स्वयंभू श्री गजाननाच्या स्पर्श दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांसह भाविक- पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. गणपतीपुळे येथील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे येथे घरोघरी गणेशाची पार्थिव मूर्ती न आणता भाद्रपदी गणेशोत्सव स्वयंभू श्री गजाननाच्या मंदिरामध्ये साजरा केला जातो. याच अनुषंगाने मंगळवारी भाद्रपदी गणेश चतुर्थी निमित्त येथे स्थानिक ग्रामस्थांना धुतल्या वस्त्रांनी गाभाऱ्यामध्ये जाऊन स्वयंभू श्री गजानन स्पर्श दर्शन घेता येते. त्याप्रमाणे मंगळवारी पहाटे ०५ : ०० वाजल्यापासून श्रींच्या स्पर्श दर्शनाची सुरुवात झाली. पहाटे पाच वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी दर्शन लाईन मध्ये उभे राहून श्री गणेशाच्या स्पर्श दर्शनासाठी हजेरी लावली लावली होती.
आज स्थानिक ग्रामस्थांसह घाट माथ्यावरून आलेल्या भक्त पर्यटकांनी स्पर्श दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी ४:३० वाजता हार फुलांनी सजवलेल्या पालखी मधून श्रींची पालखी परिक्रमा काढण्यात आली. यावेळी गणपतीपुळे येथील स्थानिक ग्रामस्थांसह हजारो भाविक पर्यटक उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालगुंड गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल कुणाल पाटील, श्री गुरव, कीर होमगार्ड श्री धावडे, सुरज जाधव आदींकडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच आलेले भाविक व पर्यटक समुद्रामध्ये समुद्रस्नानासाठी जातात त्यांच्यासाठी ग्रामपंचायत गणपतीपुळे कडून जीव रक्षक समुद्राचौपाटीवर तैनात करण्यात आले आहेत.