(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे गावामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी खोदलेला रस्ता प्रत्येक चेंबर जवळ खचला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गणपतीपुळे येथे पर्यटन विकास आराखड्या अंतर्गत सांडपाणी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. अनेक ठिकाणी मातीच्या विटांनी चेंबर बांधण्यात आले आहेत. हा रस्ता अनेक ठिकाणी खचल्यामुळे हे काम नक्की कसे झाले यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या स्थानिक ठिकाणच्या प्रत्येक ग्रुप वर खचलेल्या रस्त्याचे फोटो व्हायरल होत असून संबंधित ठेकेदाराने हे काम व्यवस्थित केले का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.याबाबत नाराजी व्यक्त होत असून पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत होणारी कामे जर अशा पध्दतीने होत असतील तर उर्वरित विकासात्मक कामे चांगल्या दर्जाची होतील की नाही,असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तसेच सध्या खोदलेला रस्ता चेंबरजवळ खचल्यामुळे पर्यटकांमधून ही भीती व्यक्त होत आहे. या खचलेल्या रस्त्याकडे संबंधित खात्याने तात्काळ लक्ष घालून दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.