(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन घेण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणच्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.तसेच अनेक पर्यटक गणपतीपुळे येथे मुक्कामासाठी थांबत असल्याने संपूर्ण गणपतीपुळे परिसरातील लॉजिंग हॉटेल्स हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच याच पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक हॉटेलमधून खास जेवणासाठी मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्रही दिसून येते. तसेच विविध सर्वच लहान मोठ्या दुकानांमध्ये पर्यटकांची वाढती रेलचेल दिसून येत आहे.एकूणच गणपतीपुळे येथे दिवाळी हंगाम पर्यटकांच्या गर्दीने गजबजून जात आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून गणपतीपुळे येथे पर्यटकांची दर्शनासाठी मोठी मांदियाळी दिसून येत असून दर्शनासाठी गणपती मंदिरात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन झाल्यानंतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत.या समुद्रकिनारी आल्यानंतर भक्त व पर्यटकांना समुद्रस्नानाचा मोह आवरत नसल्याने पर्यटक समुद्रामध्ये मोठ्या उत्साहाने आंघोळीसाठी उतरत असल्याचे चित्र दिसून येते.परंतु समुद्राच्या पाण्यात बुडून कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक तसेच गणपतीपुळे पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी दिवसभर गणपतीपुळे समुद्रकिनारी पेट्रोलिंग करीत आहेत.तसेच याच ठिकाणी आलेल्या पर्यटकांमधून काही हवशे नवशे गणपतीपुळे येथील पोलीस कर्मचारी व जीवरक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत समुद्राच्या खोलवर जात असतात. मात्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व पोलीस कर्मचारी तसेच समुद्र किनाऱ्यावरील सर्वच लहान मोठे व्यावसायिक यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेत या भक्त पर्यटकांना वेळीच बाहेर काढून पुढचा अनर्थ टाळला
जात आहे.
गणपतीपुळे येथे होणारी गर्दी पाहता येथील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,संदीप साळवी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव,पोलीस नाईक जयेश कीर,पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण,तसेच होमगार्ड गर्दीवर नियंत्रण करताना दिसून येत आहेत.
एकंदरीतच गणपतीपुळे आणि परिसरात दिवाळीच्या सुट्टीमुळे मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे एकंदरीतच सर्वच लहान मोठ्या व्यावसायिकांची चांगल्याप्रकारे आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.