(वैभव पवार /गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे उनाड गुरांचा वावर वाढला सध्या मोठ्या प्रमाणात असून या उनाड गुरांचे जथ्थेच्या जथ्थे दररोज पाहावयास मिळत असून यातीलच एका गाईने शनिवारी पहाटे एका गोंडस वासराला जन्म दिला. त्यानंतर ही गाय आपल्या वासराला त्याच ठिकाणी सोडून निघून गेली होती. या वासराला जोराची थंडी वाजून आल्यामुळे ते थरथर कापत होते. तसेच या वासराच्या आजूबाजूला कुत्रे जमा झाले होते.
ही बाब या ठिकाणी रूम व्यवसाय करणारे मनोहर तळेकर, प्रथमेश धामणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या नवजात वासराला गोणत्याच्या साह्याने लपेटून त्याला सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी वासराला जन्म देणारी गाय ही आपल्या वासरा जवळ येत नसल्याने रूम व्यावसायिक मनोहर तळेकर यांनी आपल्या दुचाकीवरून संबंधित गाईचा शोध घेतला असता संबंधित गाय ही उनाड गुरांच्या जथ्यामध्ये दिसून आली. त्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या नवजात वासराला आपल्या दुचाकीवरून त्या गायीच्या ठिकाणी सोडले. यावेळी त्या गाईने आपल्या वासराला बघितल्यावर आईच्या मायेने वासराला चाटण्यास सुरुवात केली. आईची माया हे खरोखरच अगाध असते त्याचे मूर्तिमंत उदाहरण यावेळी या ठिकाणी पहायला मिळाले. तसेच आपल्या वासराला चाटून साफ करून दुधाचा पाना या गाईने सोडला त्यानंतर या गाईचे हे वासरू अडखळत उभे राहून हलकेच उड्या माराव्यास लागले.
शनिवारी पहाटे जन्माला आलेल्या गाईच्या वासराला गणपतीपुळे येथील आपटातिठा या ठिकाणी कार्यरत असलेल्या रूम्स व्यावसायिकांनी जीवदान देऊन वाचविल्याने परिसरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.