रश्मी कशेळकर. रत्नागिरी
चांदण्यातही आलीस इथल्या
हरकत नाही
चंद्र गवसला पुनवेनंतर
हरकत नाही
हरकत नाही माझी आता कसली बाकी
डबके म्हणतील आम्हीच सागर
हरकत नाही
तुझ्या घराला कोपर्यात मी अडगळ झालो
शोधायाला पुन्हा नवे घर
हरकत नाही
घड्याळ्यात पाहिले तिने अन् समजून गेलो
निघावयाला नानिवडेकर हरकत नाही
आपल्या अशा अनेक खट्याळ ,मिश्किल गझल्सनी प्रत्येक मैफल रंगवणारे मधुसुदन नानिवडेकर यांचे काल रात्री हृदयविकाराने निधन झाले ही चटका लावणारी घटना आहे.
गझल सम्राट सुरेश भट यांची कौतुकाची थाप मिळवलेला हा श्रेष्ठ गझलकार परंतू केवळ साहित्यिक क्षेत्रातच नव्हे तर या समाजात वावरतानाही त्यांनी ही गोष्ट कधी मिरवण्यासाठी वापरलेली नाही.
सोपे शब्द ही त्यांच्या गझलची खासियत. ते गझल म्हणतायत म्हणजे आपल्याशी जीवातलं बोलतायत असं वाटायचं. मिश्किल, खट्याळ, उपरोध हा त्यांच्या गझलेचा स्वभाव आहे. मधुसुदन नानिवडेकर यांची प्रेमाची, विरहाची रचना तर त्यांचा रसिक स्वतःच्याही नकळत गुणगुणायला सुरूवात करायचा. गझल रचनेत अनेक प्रयोग त्यांनी केले आणि ढवळाढवळ,महामंडळ असे अनेक शब्द आपल्या रचनेत चपखल बसवले.
भलभलते बोलतेस का उगाच भांडतेस… ही बायको या विषयावर लिहिलेली गझल हा आणखी एक वेगळा सुंदर प्रयोग. ही गझल भीमराव पांचाळे यांनी गायलेली आपण ऐकतो. अशा अनेक गझल्स,कविता लिहिणार्या या कवीचं केवळ एकच पुस्तक प्रकाशित आहे. त्यांच्या ‘चांदणे नदीपात्रात’ या पुस्तकाला आज अनेक वर्षे उलटलेली आहेत आणि त्याच्यापाशी गझलांचा साठा होता पण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुस्तके, पुरस्कार या साहित्यिक व्यवहारी जगात त्यांना रस नसल्यामुळे ते केवळ गझल्स ऐकणारे कान शोधत राहिले. नानिवडेकर यांचा कार्यक्रम रसिकांना अस्सल आनंद देई. साहित्यिकांच्या कोणत्याही कोंडाळ्यात सामिल न होता हा कवी आपल्या विश्वात राहून लिहित राहिला.
मी कधी केली न माझ्या
वेदनांची रोषणाई
मी दिवाळी सोसण्याची
साजरी साधीच केली
घावही त्यांनीच केले
दंशही त्यांनीच केले
शेवटी श्रद्धांजलीची
भाषणे त्यानीच केली
असे विदारक सत्य मांडणारा हा गझलेचा प्रियकर या माणसांच्या व्यवहारीक जगाला सोडून गेला.
या गझलकाराला सलाम !