(रत्नागिरी)
करबुडे येथे मौजे कपिलवास्तू नगर करबुडे बौध्दजन कमीटी मुंबई आणि स्थानिक तसेच आदर्श महिला मंडळ आणि गगन मलिक फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ११ डिसेबर रोजी संबोधि बुद्ध विहार मौजे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि बौध्द धम्म प्रसारक मा. गगन मलिक यांच्या उपस्थितीत १२८ बुद्ध मूर्ती वितरणाचा भव्य कार्यक्रम सोहळा हजारो उपासक उपासिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुंबई, ठाणे , पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून बुद्ध मूर्तीची नोंदणी केलेल्या प्रत्येक बौद्ध अनुयायांना बुद्ध मूर्ती ही वंदनीय भदंत संघराज आणि गगन मलिक यांच्या हस्ते देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला संबोधित करताना गगन मलिक म्हणाले की, आम्ही भारतीय बौध्द राष्ट्रांमधून विदेशातून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती आणतो त्यावेळी विदेशात देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि प्रतिमा, प्रतिक पोचविण्याचे महत्वाचे काम करीत आहोत. थायलंड , व्हिएतनाम या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचत असल्यामुळे व्हिएतनाम सारख्या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक नवे तर दहा पुतळे उभारले जात आहेत. त्याची सुरुवात आजच्याच दिनी अर्थात बुद्ध मूर्ती वितरणाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच होत असल्याने प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
यापुढे ते म्हणाले, गगन मलिक फौंडेशनच्या वतीने आम्ही केवळ बुद्ध मूर्ती वितरणाचा कार्यक्रम करीत नाही तर या माध्यमातून बौध्द समाजातील मुलांना स्किल डेव्हलपमेंट शिकवून जपान, थायलंड, म्यानमार, इत्यादी बौध्द राष्ट्र असलेल्या देशात त्यांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याचे काम करीत असतो. बौध्द समाजाच्या स्वताच्या शिक्षण संस्था,हॉस्पिटल , कॉलेजेस, उद्योग उभे राहिले पाहिजे यासाठी कटिबद्ध आहोत. आणि त्यासाठी आपल्याच बौध्द बांधवांचे जे पाय खेचण्याचे कामं आपण करीत असतो ते थांबवले पाहिजे समाजासाठी झगडत असतो त्याला संपूर्ण सहकार्य केले पाहिजे.
बुद्ध मूर्ती प्रत्येक बौद्ध घरात, विहारात गेली तर त्यातून प्राथमिक बुद्धाची आणि धम्माची ओळख निर्माण होतें. आस्था निर्माण झाली तर तो समाज बुद्ध धम्माच्या पथावर चालण्याचा प्रयत्न करील, म्हणूनच आम्ही बुद्ध मूर्ती हे बुद्ध धम्म प्रचार प्रसाराचे प्रभावी माध्यम म्हणून बुध्द मूर्ती वितरणाचे कार्यक्रम देशभर करीत असतो. असे गगन मलिक यांनी कार्यक्रमात सांगितले.
दरम्यान सभाध्यक्ष अनिल जाधव यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय हे आयोजक असणाऱ्या तिन्ही संघटनांना दिले. यावेळी महेश सावंत आणि शैलेश जाधव यांनी हा बुद्ध मूर्ती वाटपाच्या कार्यक्रमातील त्यांनी झपाटून केलेल्या निस्वार्थी कार्याचा गौरव केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव आणि रसिक जाधव यांनी केले. तसेच मौजे कपिलवास्तू नगर करबुडे बौध्दजन कमीटी स्थानिक आणि मुंबई तसेच आदर्श महिला मंडळाच्या सर्वं कार्यकर्ते, सभासदांनी सहकार्य केले.