(नवी दिल्ली)
उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने झाशीत एन्काऊंटरमध्ये ठार केले. त्यांच्याजवळ विदेशी शस्त्रे सापडली असून दोघांवर उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, या एन्काऊंटरनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे डीजी प्रशांतकुमार यांनी सांगितले की, असद आणि त्याच्या साथीदाराचा पोलीस पथकावर हल्ला करून अतिक अहमदला सोडविण्याचा प्लान होता. पण तो अयशस्वी झाला. तर आता असदच्या एन्काऊंटरनंतर राजकारण सुरू झाले असून, गुन्हेगाराचा धर्म पाहून एन्काऊंटर केले जाते, असा गंभीर आरोप ओवेसीने केला आहे. हे संविधानाचे एन्काऊंटर आहे, असेही ओवेसी म्हणाले.
असद आणि गुलाम मोहम्मदसह सात जणांनी 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रयागराज येथे उमेश पाल यांची हत्या केली होती. तेव्हापासून ते फरार होते. विशेष कृती दल या दोघांच्या मागावर होते. सुरुवातीला दिल्लीला त्यांचे लोकेशन ट्रेस झाले. पण पोलीस पोहोचण्याच्या अगोेदर ते फरार झाले. त्यानंतर दिल्लीमध्ये ज्यांच्या घरी ते थांबले होते त्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत असदचा ठावठिकाणा मिळाला आणि युपीएसटीएफचे 12 जणांचे पथक असद आणि गुलामच्या मागावर निघाले. पोलीस सतत त्या दोघांचे लोकेशन ट्रेस करत होते. अखेर आज ते दोघे झाशीजवळच्या बडागाव परिसरात असल्याचे समजताच पोलीस पथक त्यांच्या शोधासाठी निघाले. यावेळी स्थानिक पोलीसही त्यांच्यासोबत होते. बडागाव येथील परिच्छा डॅम परिसरात असद असल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलीस आलेले पाहताच असद आणि गुलाब मोटारसायकलवरून एका कच्च्या रस्त्यावरून पळण्याचा प्रयत्न करत होते. पण गडबडीत मोटारसायकल स्लीप झाली आणि ते खाली पडले आणि झाडीच्या दिशेने पळत होते. याचदरम्यान पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांना घेरले व शरण येण्यास सांगितले. परंतु असदने पोलिसांच्या दिशेने आपल्याकडील पिस्तूलातून गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनी आत्मरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात असद आणि गुलाम यांचा मृत्यू झाला.
एन्काऊंटरवरून राजकारण सुरू झाले आहे. अखिलेश यादव यांनी सांगितले की, युपीतील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष्य ओढवण्यासाठी अशा प्रकारची एन्काऊंटर केली जात आहेत. तर मायावतींनीही हे एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप केला आहे. , युपीचे मुख्यमंत्री योगी आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मात्र हे एन्काऊंटर खरे असून, त्याबद्दल युपी एसटीएफचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे आता हे एन्काऊंटर वादाचा एक मोठा मुद्दा बनणार आहे.