(रत्नागिरी)
गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने खोटे सोन्याचे नाणे देऊन रत्नागिरी शहरातील एका तरुणाला ६ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दिनकर (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) नावाच्या भामट्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीप्रकरणी सरदार राजाराम गोसावी (२८, रा. आठवडा बाजार, रत्नागिरी, मूळ रा. तांदूळवाडी, ता. वाळवा, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरदार गोसावी याने जावा क्लासिक दुचाकी (एमएच ०४, केके ८४५१) विक्री करण्यासाठी ओएलएक्सवर टाकले होते. या जाहिरातीच्या अनुषंगाने गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दिनकर नावाच्या व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने आपल्याकडे सोन्याचे नाणे असल्याचे सरदार गोसावी यांना सांगितले. दोघांची रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान एका ठिकाणी भेट झाली. या भेटीदरम्यान दिनकर याच्यासोबत अन्यही काही माणसं होती. या भेटीत दिनकर नावाच्या व्यक्तीने आपल्याकडील नाणे गोसावी यांना दिले. त्यासाठी त्यांच्याकडून ६ लाख रुपये दिनकर याने घेतले.
मात्र, त्यानंतर गोसावी यांनी आपल्याला दिलेल्या नाण्याबाबत खातरजमा केली असता, हे नाणे खोटे असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.