(मुंबई)
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कळले आहे. त्यामुळे खोकेवालेही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरत आहेत. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन लढा. लोक कुणाला मत देतात ते बघूया, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
हिंदुत्वाच्या आधारे धोक्याची भिंत उभारून देशावर पोलादी पकड घट्ट बसवण्याचा भाजपाचा प्रयत्न असून देश हुकूमशाहीकडे जात असल्याची टीका ठाकरे यांनी केली. खोक्यांनी गद्दार विकले जातात, शिवसैनिक नाही. अनेक आमदार, खासदार गेले तरी आजही शिवसेनेत तेच चैतन्य, तोच उत्साह आणि तीच गर्दी आहे. गद्दार विकत घेता येऊ शकतात. मात्र हे जे काही चैतन्य कधीही विकत घेता येत नाहीअसा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपावर केला.
शिंदे-भाजप सरकारच्या पुढाकाराने विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले. या कार्यक्रमावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजपवर टीका केली. राजकारणासाठी आमचे वडील पळवले, पण या भानगडीत स्वत:च्या वडिलांचे नाव विसरू नका, असा टोला त्यांनी लगावला. तर देश सध्या हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्व वगैरे थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारे धोक्याची भिंत उभारून देशावर पोलादी पकड बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली.