(कडवई/मिलिंद कडवईकर)
वाघजाई गजानन जांगलदेव सेवा समिती कडवई तांबडवाडीच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदय झावरे म्हणाले की, ‘विद्यार्थी दशेपासून खेळाची असलेली आवड तुम्हाला करियरमध्ये बदलता येऊ शकते पण त्यासाठी नियमित सराव, व्यायाम व चिकाटीची गरज आहे. रनिंगच्या खेळातूनच माझं करियर बहरलं. खेळातून व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, निर्णयक्षमता इ गुणांचा विकास होतो जो भविष्यात उपयोगी पडतो म्हणून खेळाकडे खेळ म्हणून न पाहता करियर म्हणून पहा’ असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत माही स्पोर्ट्स, कडवईच्या संघाने राजे लायन्स गोळवली संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. गणपती बाप्पा मोरया, चिखली संघ तृतीय तर वाघजाई गजानन जांगलदेव कडवई संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. उत्कृष्ट चढाई पुरस्कार राजे लायन्सच्या जय बसवणकर याला तर उत्कृष्ट पकडपटू पुरस्कार दबंग दिल्ली संघातून खेळलेल्या प्रतीक पाटील याला मिळाला. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून खेलो इंडियात चमकलेल्या हृषीकेश देसाई याने पटकावला. या स्पर्धेत पंचक्रोशीतील 12 व निमंत्रित 12 अशा एकूण 24 संघांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, माजी सरपंच वसंत उजगावकर,प्रमोद कडवईकर, पापा चव्हाण, सचिन कामेरकर, कडवई गावचे गावप्रमुख व सर्व मानकरी यांनी उपस्थिती लावली. स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक आंबेकर,राहुल खानविलकर, गौरव यद्रे व बांडागळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर, शशिकांत किंजळकर,मिलिंद शिंदे, मोहित पंडव यांनी केले तर गुणलेखक म्हणून युवराज गायकवाड व साईराज गुरव यांनी काम केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाडीतील महेंद्र पाले, सिताराम पाले, अनंत जोशी, संभाजी जोशी, सुरेश जोशी, राघो नवेले, मंगेश नवेले, रमेश नवेले, बाळकृष्ण गोटेकर व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली