( मुंबई )
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राने आता ३८ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३१ कांस्यपदके मिळवत १०३ पदकांसह आघाडी कायम राखली आहे. हरियाणा, मध्य प्रदेश यांच्यात दुस-या क्रमांकासाठी रस्सीखेच कायम आहे. हरियाना (२५, २०, १८) अशा ६३ पदकांसह दुस-या, तर मध्य प्रदेश (२५, १३, २३) अशा ६१ पदकांसह तिस-या स्थानावर आहे.
अपेक्षा फर्नांडिसने जलतरणात, तर पूजा दानोळेने सायकलिंगमध्ये सुवर्ण हॅट्ट्रिक साजरी केली. महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिसने बुधवारी दोन, तर वेदांत माधवने एक सुवर्णपदक मिळवत आपली सुवर्णपदकांची संख्या वाढवली. अपेक्षाने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात २ मिनिट ३९.८७ सेकंद अशी वेळ देत हे यश मिळविले. पाठोपाठ अपेक्षाने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ०३.६९ सेकंद वेळ देत दुस-या सुवर्णपदकाची कमाई केली.
वेंदातने आपल्या २०० मीटर फ्री-स्टाईलच्या सुवर्णपदकात बुधवारी १५०० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात बाजी मारली. त्याने १६ मिनिटे १६.७४ सेकंद अशी वेळ दिली. १०० मीट बॅक स्ट्रोक शर्यतीत प्रतिक्षा डांगीने १ मिनिट ०८.९२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. याच प्रकारात कोल्हापूरची भक्ती वाडकर १ मिनिट ०९.२३ सेकंदासह ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. मुलींच्या चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत अनन्या नायक, दिप्ती तिलक, पलक जोशी, अपेक्षा फर्नांडिस या चमूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या चमूने ४ मिनिट ०६.७१ सेकंद अशी वेळ दिली. कर्नाटकाने ४ मिनिट ०६.१० सेकंदासह सुवर्णपदक पटकावले.