(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील जय गणेश प्रतिष्ठान, खेरशेत या मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी – बारावी व उच्च पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास तीस विद्यार्थ्यांना भेटवस्तू व शाळापयोगी साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशितोष कदम व मेकॅनिकल इंजिनिअर झाल्याबद्दल सारिका मते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा.मिलिंद कडवईकर यांनी ‘दहावी-बारावीनंतर पुढे काय?’या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, करियर निवडताना आपली आवड, क्षमता व उपलब्ध संधी यांचा अभ्यास करून करियर निवडावे. त्याचबरोबर विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना कोणत्या सी. ई. टी.दयाव्या लागतात याची माहिती त्यांनी दिली.आपल्या पाल्याला घडवताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करताना त्यांनी राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग उभे केले. श्री.सुरेश भायजे यांनी बेंडलवाडीतील ग्रामस्थानी ४० वर्षांपूर्वी दारू बंदीचा निर्णय घेऊन आजपर्यंत कशाप्रकारे प्रगती केली त्याचे कौतुक केले. माजी सरपंच सोमा बेंडल यांनी शासनाचा निधी न घेता वाडीतील लोकांनी एकत्र येऊन पाणी योजना व समाज मंदिर उभारणी कश्याप्रकारे केली ते सांगितले. श्री.संजय कदम यांनी विद्यार्थ्यांनी पोलीस,सैनिक होऊन देशसेवा करावी असा मनोदय व्यक्त केला. कष्टातून कसे मोठे होता येते ते त्यांनी डॉ.राजेंद्र भारुड यांचे उदाहरणातून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र घाणेकर यांनी केले. या कार्यक्रमाला सामजिक कार्यकर्ते विलास डिके, रवींद्र मते, अनंत शिगवण, कृष्णा डिके, अनंत कदम, राजेंद्र मते, दत्ताराम लांबे, काशिराम बेंडल, सोनू बेंडल, चंद्रकांत बेंडल, महेश फेफडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे स्थानिक सदस्य तसेच मुंबई व पुण्यातील सदस्यांनी मेहनत घेतली.