(खेड / भरत निकम)
आंबवली विभागातील वरवली ते वरची हुंबरी पुलाच्या उत्तर बाजूला दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
खेड तालुक्यातील आंबवली अठरा गाव विभागात वरवली ते वरची हुंबरी या दोन गावांना जोडणारा पूल आहे. तो वाहतूकीसाठी खुला असून वाहनांची रहदारी सुरु आहे. सुहास अनिल जाधव (२६, रा.धवडे, ता.खेड) हा ताब्यातील होंडा डिलक्स दुचाकी (क्र. एमएच ०८ एएम ८४०१) ने वरची हुंबरी येथे डिश टीव्हीचे काम करण्यासाठी निघाला होता. तो आपल्या बाजूने पुढे निघालेला असताना पुलाच्या उत्तर दिशा बाजूला आला तेव्हा समोरुन यश विजय यादव ( रा. आंबवली देऊळवाडी) हा तरुण ताब्यातील यामाहा कंपनीची फेजर ही दुचाकी (क्र. एमएच ०८ एएफ ४१४९) घेऊन भरधाव वेगाने समोर आला. तो रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता हयगयीने, अविचाराने, बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने दुचाकी चालवून आपली साईड सोडून रस्त्याच्या राॅंग साईडने आला. त्याच्या दुचाकीची धडक सुहासच्या दुचाकीस बसली. भरधाव वेगाने ही धडक बसल्याने अपघात घडला आहे. या अपघातात सुहास हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची जखम झाली होती तसेच यश हा सुद्धा जखमी झाला होता. जखमी अवस्थेत दोघांना मदतकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले होते. यात सुहासची प्रकृती गंभीर झाली होती.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल विक्रम बुरोंडकर यांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला आहे. यश यादव यांच्याविरोधात मोटार वाहन कायद्यासह अन्य कलमान्वेय गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी सुहासला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.