(खेड / भरत निकम)
खेड शहरातील भरणे ते चिंचघर या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना एसटी स्टँड परिसरासह वाणीपेठ, गांधी चौक, हनुमान पेठ, सफा मज्जीद चौक, गुजर आळी, पान गल्ली, तीनबत्ती नाका अशा शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर दिसून आली आहे.
दिवसभर या ठिकठिकाणच्या वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहन चालक व नागरिकांना सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांसह मुंबई, ठाणे, पुणे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन गणपती करिता येतात. त्यामुळे खेड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तीनबत्ती नाका या रस्त्यावर सातत्याने वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. शिवतर रोड कडून बाजारात जायला पाथरजाई देवीच्या मंदिरासमोरचा रस्ता आहे. या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत होते. वाहतूक कोंडी झाल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो, अशी परिस्थिती सतत या परिसरात निर्माण होऊ लागली आहे.
खेड शहरामध्ये वाहतुकीची समस्या पाहता ठिकठिकाणच्या वाहतूक कोंडीवर लक्ष देण्यासाठी सीसीटीव्ही आणि वाहन चालक यांना सूचना करणारी यंत्रणा कार्यान्वित केली होती. सीसीटीव्हीत एखादे वाहनं वाहतूकीस अडथळा ठरत असेल तर लागलीच ध्वनी क्षेपकाव्दारे वाहन चालकाला सूचना दिल्या जात असत. तसेच या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित वाहनासह चालकावर दंडात्मक कारवाई केली जात होती. ही पोलिसांची यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून सक्षमपणे चालत नाही. तर, सूचना करण्यात कुणाला पोलिस ठाण्यात स्वारस्य उरलेले नाही. त्यावेळच्या पोलिस अधिकारी यांच्या आधुनिक संकल्पनेतून हा मोठा प्रकल्प येथील नागरिकांच्या सहकार्याने अंमलात आला होता. त्यानंतर पुढच्या काही काळातच त्या अधिकारी यांची बदली झाली आणि तो प्रकल्प बंद पडला, असे चित्र दिसत आहे.
त्याचबरोबर खेड स्टॅण्ड वर कार्यान्वित केलेले पोलिस कर्मचारी घाणेकर हेही सध्या गायब झाले आहेत. त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. ते चूकी दिसताच क्षणी थेट कारवाई करीत होते. वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या अनेक शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी पकडून पोलिस ठाण्यात पालकांना फेऱ्या मारायला लावल्या होत्या. त्यामुळे घाणेकर यांची दहशत आजही खेड शहर आणि परिसरात आहे.
खेड शहरात प्रवेश करण्यापूर्वी शहरातील रस्ते आणि वाहतूक सूचनांची माहिती वाहनं चालक यांना होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन यांनी सूचना फलक लावणे गरजेचे होते. शहरातील एकेरी वाहतूकीसह रस्ता कुठून कुठपर्यंत जातो, हे समजून घेणे सोपे जाते. त्याशिवाय शहरात वाहनांची पार्किंग व्यवस्था कुठे आहे, हे सुद्धा समजू शकते. मात्र अशी कुठलीही सोय शहरात उपलब्ध नाही. ‘मुकादम लॅण्डमार्क’ परिसर वगळता इतरत्र कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. त्यामुळे विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली की नागरिक रस्त्यावर चालू शकत नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहनांने पार्क झाल्यानंतर कमी जागेच्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ होवून वाहतूक कोंडी आपोआप होते.
खेड शहरातील अनेक दुचाकी चालवणारे वाहतूक कोंडी झाली की, थेट विरुद्ध दिशेने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. यामुळे ही वाहतूक कोंडी आणखीन तीव्र होत असते. ही समस्या लवकर अजिबात सुटतं नाही. त्यासाठी ड्युटीवरच्या नवख्या पोलिस कर्मचारी यांना ठिकठिकाणी रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे.