(खेड)
सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या वेळेत अंतर कापणं हेच यातील महत्वाचं वैशिष्ट्य. अठरा वर्षावरील कोणालाही सहभागी होता येईल, अशा या क्रीडाप्रकाराचं खेड शहरात प्रथमच आयोजन केले जात आहे.
रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असणा-या सह्याद्री रँडोनिअर्स व खेड सायकलिंग क्लबच्या सहकार्याने सदरचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 06 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता विजय उपहारगृह, खेड येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवून सायकलिंगला सुरुवात होणार असून सर्व सायकलस्वार कोलाड येथे पोचून लगेचच परतीचा प्रवास सुरु करतील व साडेतेरा तासाच्या आत म्हणजेच सकाळी सातच्या आत सायकलने दोनशे किमी अंतर कापून खेड येथे पोचतील. संपूर्णपणे सेल्फ सपोर्टेड असणारी ही राईड नाईट बीआरएम म्हणून ओळखली जाणार आहे.
या इव्हेंटसाठी पंचवीसहून अधिक रायडर्स सहभागी झाले असून वेळेत अंतर कापणा-या रायडर्सना ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लबतर्फे फिनिशर मेडलसह गौरवण्यात येईल. तरी या नवीन क्रीडा प्रकाराच्या शुभारंभावेळी सायकलप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड सायकलिंग क्लबतर्फे करण्यात येत आहे.