( खेड / भरत निकम )
शासनाच्या अनेक योजनांची कामे करण्यास तालुक्यातील अनेक महिला बचत गटातील ९६८ महिलांची २६ लाख ४४ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल झाली असून फसवणूक करणाऱ्या दोघांनी शासनाच्या ४ योजनांचा फंडा वापरुन फसवले आहे. या फसवणूकीत आणखी किती योजनांचे अमिष दाखवले होते, तसेच या दोघांचे सगळे कारनामे उघडकीला आणण्यासाठी तपास करणाऱ्या पोलीसांनी कंबर कसली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महिला बचतगट कार्यरत आहेत. यातील खेड तालुक्यातील हजारो महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, घरकुल, गोठ्याच्या बांधकामास सवलतीच्या दरात फंड देतो, असे सांगून महाराष्ट्र क्रांती सेना संघटनेचा युवा अध्यक्ष संदीप शंकर डोंगरे (रा. वाराणी-कासार, जि. बीड) व त्याचा सहकारी बबन मारुती मोहिते या जोडीने काही रक्कम जमा केली होती. यानंतर काही महिलांना शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप एक छोटेखानी कार्यक्रम घेवून केले होते. यामुळे विश्वासास पात्र ठरलेल्या या दोघांनी येथील काही लोकांच्या मदतीने आणखीन महिलांकडून रक्कम जमवून घेतली होती. यानंतर योजनेनुसार वस्तू येतील आणि त्यांचे वाटप होईल, असे सांगितले होते.
या वस्तूंच्या अपेक्षेने पैसे दिलेल्या महिला प्रतिक्षा यादीत होत्या. सगळं काम सोपे होणार, या आशेवर पैसे दिलेल्या महिला होत्या. यानंतर अनेक महिन्यांचा कालावधी लोटला. पैसे देऊन वस्तू मिळाल्या नाहीत, असा तगादा महिलांनी लावला होता. यानंतर या जोडगोळीला संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. मात्र दोघांचेही फोन लागले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही संपर्क होत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले. यानंतर सुरुवातीला ८३९ महिलांनी २१ लाख १८ हजारांची फसवणूक झाली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तसेच आणखीन काही महिलांची फसवणूक झाली असल्यास खेड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
त्यानंतर ९९ महिलांकडून २ लाख २५ हजार ६० रुपयांची फसवणूक झाली आहे, अशी तक्रारही दाखल झाली होती. पोलीसांनी तपासचक्रे फिरवून संदीप डोंगरे याला ताब्यात घेतले होते. त्याला येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. तो सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरु असताना आणखी ३० महिलांनी ३ लाख ४४ हजार रुपये दिल्याची फिर्याद दाखल केली आहे. हि एकुण रक्कम २६ लाख ४४ हजार इतकी झाली असून ९६८ महिलांची फसवणूक झालेली आहे. सगळे पूरावे पोलीसांना महिलांनी सादर केल्याने फसवणूक झाल्याची शक्यता बळावली आहे. या प्रकरणातील संशयित बबन मोहिते हा बेपत्ता असून त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
या संपूर्ण फसवणूक प्रकरणात अनेक कारनामे उघडकीला आणण्यासाठी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर त्यांचे सहकारी उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी तपासकामी गतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहेत. लवकरच सगळ्या फसवणूकीचा उलगडा होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.