(खेड / भरत निकम)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेली सात दिवस उपोषण करणारे मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्या वतीने शनिवारी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे निवेदन मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांना सादर केले आहे.
निवेदनानुसार, ‘मराठा समाजाचे जरांगे पाटील एक चळवळीतील संघर्ष करणारा तरुण समाजासाठी जीवाची बाजी लावून लढत आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी आम्हा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना स्वस्थ बसू देत नाही. खरं तर आरक्षण ही घटनात्मक बाब आहे आणि सरकारच्या हाती आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला ५० टक्के वरती आरक्षण द्यायचे असल्यास राज्य आणि केंद्र सरकार यांनी विशेष अधिवेशन बोलावून घटनात्मक बदल करुन ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा ठराव संमत करावा, म्हणजे खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि त्यांचा सन्मान होईल.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तब्बेत सांभाळावी आणि उपचार घ्यावेत, याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेडच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सादर केल्याचेही नमूद केले आहे.