(खेड / इक्बाल जमादार)
मागील ४ वर्षा पासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम केटीआयएल कंपनी करीत आहे. या कंपनी मार्फत कशेडी ते धामणदेवी असे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. भरणे नाका येथील रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले असून खडी वर आलेली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या या दुरावस्थेला केटीआयएल कंपनीला जबाबदार धरून खेड तालुका व खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार संजय कदम आणि बाबाजी जाधव यांनी निवेदन दिले आहे. महामार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत नाहीत आंदोलन पुकरावे लागेल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
खेड तालुक्यामध्ये येणाऱ्या ४४ कि.मीच्या महामार्गाच्या कामामध्ये कशेडी कडुन धामणदेवी कडे जाताना तुळशी विन्हेरे फाटा, वावे फाटा, बोरकर चिंचवली फाटा, आपेडे फाटा, खोपी फाटा, शिव फाटा असे अनेक महत्त्वाच्या गावाकडे जाणारे जोडरस्ते आहेत. अशा ठिकाणी बाक्स पुल उभारणे अत्यंत गरजेचे असताना केटीआयएल कंपनीने खेड तालुक्यातील ४४ कि. मी. च्या भागामध्ये असे बॉक्स पुल उभारले नाहीत. त्यामुळे महामार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि केटीआयएल कंपनीचा पॅनल जबाबदार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी खेड तालुकाध्यक्ष श्री.सतु कदम, सरचिटणीस श्री.अमित कदम, नगरसेवक व खेड शहराध्यक्ष श्री. राजेश संसारे, श्री.आरीफ मुल्लाजी, श्री.काणेकर, श्री.मुकत्यार कावलेकर, श्री.भाई कडु, श्री.अक्षय कडु, सुकिवली ग्रामपंचायत मा.सरपंच श्री.विनायक निकम, भरणे ग्रामपंचायत सरपंच श्री.संदीप खेराडे, उप सरपंच श्री. राजेश मोरे, भरणे ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष गोवळकर, श्री.प्रदिप सकपाळ, श्री.दादु राठोड, श्री.मिंलिद काते, ग्रामपंचायत सदस्य श्री.जाधव, श्री.नितिन शेठ पाटणे, श्री.काकडे, श्री.अक्षय बेलोसे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड रेल्वे स्टेशन समोरील खोपी फाटा येथे देखील सदोष पॅनलमुळे भविष्यात महामार्ग सुरू झाल्यावर अपघात होण्याची दाट शक्यता आहेत. खोपी फाट्यावरून आतमध्ये ४०/४५ गावांचा संपर्क असतो. त्यामुळे खोपी फाट्यावर रहदारी जास्त आहे. अशा ठिकाणी बॉक्स पुल न दिल्याने अपघाताच्या शक्यता वाढलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे जगबुडी नदीवरील पूल आणि भरणा नाका बाजूकडील पुलाला जोडणारा रस्ता यांचा अॅगल चुकलेला आहे. भविष्यात पुलाच्या इंट्री पॉईंटवर धोकादायक टर्न असल्याने गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे भरणे नाक्या वरील सर्विस रोडची देखील अत्यंत दुर्दशा झालेली आहे. सदरचा सर्विस रोड चांगल्या प्रतीचा बांधून त्वरित पूर्ण होणे गरजेचे आहे. भरणे नाका येथे सर्विस रोडवर चिखलाचे साम्राज्य झालेले आहे असुन अनेक छोटे मोठे अपघात नेहमी घडत आहेत. तरी सदरचा सर्विस रोड दुरुस्त होवून चांगल्या प्रतीचा बनणे आवश्यक आहे. तरी वर नमूद सर्व सुचना प्रमाणे त्वरित कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी आणि केटीआयएल कंपनीचे ठेकेदार यांचे विरुद्ध तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात येतील असे त्यांनी म्हंटले आहे.