(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघरनजीक खासगी आरामबसने कारला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात पुणे येथील थेरगाव रूग्णालयातील वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनोज भावसार यांचा जागा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी खासगी आरामबस चालक सुशांत सुखदेव सरकार (47, रा. अंधेरी-मुंबई) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेच्या थेरगाव दवाखान्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करणारे मनोज भावसार हे एम.एच. 14/ई.सी. 8355 कमांकी कार रस्त्याच्या बाजूला उभी करून कारमधील डिकीतून सामान काढण्यासाठी खाली उतरले. यावेळी मुंबईहून कणकवलीला जाणाऱ्या सुशांत सरकार याच्या ताब्यातील एम.एच 01/ सी.आर. 3535 क्रमांकाच्या खासगी आरामबसने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मनोज भावसार यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज भावसार यांच्या मृत्यूसह कारच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक सुशांत सरकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.