(खेड)
खेड पोलिसांच्या पथकाने हातभट्टीच्या चार दारुअड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत दारूसाठी लागणारा गूळ, नवसागर, हातभट्टी दारू असा एकूण ६ लाख ६० हजार ८७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी सकाळी ७.०० वाजता कुळवंडी, देऊळवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी मंगेश दगडू निकम, सुरेश रुमाजी निकम, संतोष जयराम निकम, अशोक लक्ष्मण निकम (सर्व रा. खेड) यांच्याविरुध्द खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुनगेकर यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक तयार करून छापे टाकण्यात आले. एकूण ४ संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. एका ठिकाणी हातभट्टी बेवारस असल्याचे आढळले. या कारवाईमध्ये हातभट्टी, दारूच्या टाक्या, रसायन आदी मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आले. या धडक कारवाईने खेड येथील अवैध्य धंदेवाईक चांगलेच धास्तावल्याचे दिसून येते.
या धडक कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उप निरीक्षक सुजीत सोनवणे, दीपक गोरे, महेंद्र केतकर, दिनेश कोटकर, विक्रम बुरोंडकर, विनय पाटील, रमेश बांगर, लतिका मोरे, रुपेश जोगी, अजय कडू, राहुल कोरे, श्री. जोयशी व कृष्णा बांगर आदींचा सहभाग होता.