(खेड)
रत्नागिरी जिल्ह्याच्या भुषणात एक मोठी बातमी असून दुर्गप्रेमींसाठी नुकतीच आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण किल्ले अभ्यासकांना महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अंधारात असलेला एक नवीन किल्ला आढळून आला आहे. खेड तालुक्यातील पालगड गावाजवळील रामगड येथे हा किल्ला आढळला आहे. दुर्ग अभ्यासक डॉ. संदीप परांजपे आणि डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व अभ्यासक सचिन जोशी यांनी या रामगडाचा शोध लावला आहे. तसेच यावेळी त्यांनी त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि वास्तूरचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित एक प्राथमिक अहवाल देखील प्रसिद्ध केला आहे.
डॉ. संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी नुकत्याच झालेल्या इतिहास संशोधक मंडळाच्या बैठकीमध्ये रामगडाबाबत अहवाल सादर केला. यावेळी इतर अभ्यासकांकडून विचारण्यात आलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले. अशा प्रकारे बैठकीतील चर्चेतून रामगड हा एक अप्रकाशित दुर्ग असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक द्यायची झाली तर ती अशी कि, रत्नागिरी जिल्ह्यातील साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर रामगड हा छोटेखानी किल्ला आहे. पालगडाचा रामगड हा जोडकिल्ला असून, आजवर कधीही या किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. हे लक्षात घ्या कि, महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले असून, यातील पहिला, जो सर्वाना माहिती असलेला रामगड किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे. तर दुसरा रामगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे. मात्र या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याबाबत अजूनही काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, हा किल्लादेखील पालगडाबरोबरच बांधला गेला असावा, असा अंदाज संदीप परांजपे आणि सचिन जोशी यांनी बोलताना व्यक्त केला आहे.