(खेड)
खेड तालुक्यातील पुरे खुर्द गावामध्ये दि. ११ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने सुमारे ४० घरांचे वीजमीटर जळून खाक झाले. यामध्ये संपूर्ण घरांमधील वायरींग जळून गेली आहे. व टीव्ही, फ्रिज, मोबाईल आदी उपकरणांचे नुकसान झाले आहे. या घटनेला तीन दिवस झाले तरी अद्यापपर्यंत नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. येथील अधिकारी जळून गेलेले वीजमीटर व सर्व्हिस वायर बदलून देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
येथील गावदेवी मंदिराच्या लगतच मोठ-मोठ्या झाडी झुडूपातून गेलेल्या वीज वाहिन्यांवर शॉर्टसर्किट झाले. यामध्ये विजेच्या तारा अक्षरशः वितळून रस्त्यावर पडलेल्या होत्या, तर ट्रान्सफॉर्मर असलेल्या भागामध्ये स्फोटासारख मोठे आवाज झाले. पहाटेच्या झालेल्या या प्रकाराने संपूर्ण गावामध्ये एकच धावपळ उडाली. ज्याने त्याने आपापल्यापरीने वीज मीटरला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याचवेळी येथील एका जाणकाराने मुख्य ट्रान्सफॉर्मरवरील कटआऊट प्रसंगावधान राखून बंद केल्याने पुढील अनर्थ टळला होता. तोपर्यंत सुमारे ४० बीजमीटर जळून खाक झाले होते. प्लास्टिक जळून वितळते त्याप्रमाणे वीज मीटर जवळून वितळून गेले होते.
झाला प्रकार तत्काळ महावितरणच्या कार्यालयात कळविण्यात आला होता. मात्र, येथील अधिकारी तब्बल आठ तासांनी गावामध्ये दाखल झाले होते. या वेळी केवळ एक, दोन घरांमध्ये चौकशी करून मीटरचे फोटो, मोबाईल नंबर व नाव घेऊन काही क्षणातच निघून गेले. घटनेच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत मुख्य वीज वाहिन्याही दुरुस्त करण्यात आलेल्या नव्हत्या. घडल्या प्रकाराच्या मुळाशी गेले असता महावितरणच्या नाकर्तेपणा पुढे आल्याचे पाहावयास मिळाले.
रस्त्याच्यालगत असलेल्या मोठ-मोठ्या झाडांमधून येथील मुख्य वीज वाहिन्या गेलेल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात येथील ग्रामस्थांनी महावितरणकडे आम्ही दोन्ही बाजूला दहा फुटापर्यंत झाडे तोडून टाकू, आम्हाला फक्त लाईट बंद करून द्या, अशी मागणी केली होती.. त्यावेळी ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या दुर्लक्षपणामुळे आज ही वेळ आल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखविली.