(संगलट / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटानजीक पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ३ किलो ७५८ ग्रॅम गांजाच्या साठ्यासह लक्ष्मण कुंदन भोरे (३९) याच्यापाठोपाठ उज्ज्वला बाळकृष्ण मेकले (३५, माजगांवकर माळ झोपडपट्टी-सातारा) या महिलेसही पोलिसांनी गजाआड केले आहे. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गांजा विक्री प्रकरणाचे नेमके कनेक्शन शोधून काढण्यात येथील पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.
सातारा येथून दोघेजण एका दुचाकीवरून गांजाचा साठा घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी येथील सरस्वती मंदिराच्या शेजारी खास ग्राहकांना विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ४ पोलीस पथके तयार करत ४ ठिकाणी तैनात केली होती. यासाठी २ पिकअप व्हॅनचाही वापर केला होता. तब्बल ६ तास पथकाने चारही ठिकाणी तळ ठोकला होता.
पथकामार्फत महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात आली असतानाच मुंबईहून खेडच्या दिशेने विना नंबरप्लेटची निळ्या रंगाची यामाहा कंपनीची दुचाकीवरून दोघेजण येताना निदर्शनास आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दोघांनाही बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास रंगेहाथ पकडत पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी दोघांचीही झडती घेतली असता ५६ हजार २५७ रुपये किंमतीच्या ३ किलो ७५८ ग्रॅम वजनाच्या गांजाच्या साठ्यासह १ लाख २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी व १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल, ५०० रूपये सॅक असा १ लाख ९१ हजार ८०७ रूपयांचा ऐवज जप्त केला.
दरम्यान या प्रकरणी दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोघांकडे अंमली पदार्थाचा कोठेतरी मोठा साठा असण्याची दाट शक्यता असून विक्री करण्यासाठी कोण-कोण मदत करत होते? याचा तपास करण्याबाबत सरकारी वकील स्मिता कदम यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत दोघांनाही २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.