(संगलट / इक्बाल जमादार)
खेड शहरातील महाडनाका येथे शुक्रवार दि.१५ रोजी सकाळी ९ वाजता केंद्र सरकार व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीनं आयोजित व्यसनमुक्त भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजस्थान येथून ओमकार चंद, खेडचे माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे यांच्यासह अनेक मान्यवर होते.
शहरातील महाडनाका येथे लाईट हाऊस मध्ये भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या मध्ये ४ मार्च २०२३ रोजी झालेल्या सामंजस्य करारानुसार संपूर्ण देशात नशामुक्त भारत हे अभियान सुरू केले आहे.
ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या आरोग्य विंग मार्फत शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर रोजी खेड येथे या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजस्थान येथील प्रा. ओंकार चंद, खेडचे माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे, पत्रकार हर्षल शिरोडकर, चंद्रकांत बनकर, अनुज जोशी, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, कोल्हापूर, इस्लामपूर, रत्नागिरी, मलकापूर, तासगाव, दापोली येथील सेवा केंद्राच्या संचालिका उपस्थित होत्या. यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक मिश्रा यांनी केले तर खेड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी गीता, ब्रह्मकुमारी स्वरूपा यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी ब्रह्मकुमारी वैशाली यांनी या अभियानाचा उद्देश विशद केला. प्रा. ओंकार चंद यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयीन युवकांना व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगत आगामी कालावधीत अभियानात केले जाणार आहे. त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
व्यसन हे कमजोर मनाचे लक्षण असून राजयोगाच्या माध्यमातून आनंदी व प्रसन्न मानसिक स्थिती मिळवणे सहज शक्य असल्याचे अनेक प्रयोगातून सिद्ध झाले आहे याची अनेक उदाहरणे आमच्यासमोर आहेत त्यामुळे या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन माहिती घ्यावी असे आवाहन प्रा.चंद यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी बिपिन पाटणे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्याना मोबाईलचे व्यसन जडले असून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. यानंतर उपस्थित सर्वांना दापोली केंद्राच्या राजयोग प्रशिक्षकांनी नशामुक्त भारत निर्माण करण्यासाठी शपथ तसेच राजयोगाची अनुभूती समालोचनासह करून दिली. यानिमित्ताने ब्रह्म कुमारी संस्थेच्या सदस्यांनी शहरातून व्यसनमुक्त भारत रॅली काढण्यात आली.
खेड मध्ये दोन दिवस हॅपिनेस व मेडीटेशन शिबिर
खेड शहरातील शिवनेरी नगर येथे पाटणे लोन मध्ये दिनांक १६ व १७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत प्रा. ओंकार चंद हे खुशिया आपके द्वार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यामध्ये व्यसनमुक्ती तणाव मुक्ती व मानव संबंधांमध्ये गोडवा वाढवण्यासाठी वेगवेगळे राज योगातील प्रयोग सादर करणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन खेड केंद्राच्या संचालिका गीता बहेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.