( खेड/ प्रतिनिधी )
खेड तालुक्यात एका वृध्दाला वर्षभराच्या कालावधी वेगवेगळया नावाने फोन करुन 85 लाख 82 हजार 161 रुपयांना लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अरविंद चंदुलाल तलाठी (66, खेड, तीनबत्ती नाका) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद तलाठी यांना 20/10/2021 ते 3/9/2022 या कालावधीत वेगवेगळया नावाने विक्रम सरोही, श्रीवास्तव, राणा, कविता शर्मा, अभिजित बॅनर्जी, अजित मुदलिक, विठ्ठल भाई पटेल, अभय शुक्ला प्रमोद ठाकूर तलाठी अशा नावांनी फोन येत होते. त्यांनी तलाठी यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक खात्याच्या आणि जुन्या पॉलिसीजचा संदर्भ देवून समोरुन तलाठी यांच्या भोळया स्वभावाचा गैरफायदा घेवून विश्वास संपादन केेला. वेळोवेळी विविध कारणे सांगून पी. आर. सर्व्हिसेस कंपनीतून बोलतोय सांगून अरविंद तलाठी यांच्या आय. सी. आय बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँकेच्या खात्यातून 48 वेळा ट्रान्झेक्शन करुन एकूण 85 लाख 82 हजार 161 रुपयांची फसवणूक केली.
अरविंद तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विक्रम सरोही, श्रीवास्तव, राणा, कविता शर्मा, अभिजित बॅनर्जी, अजित मुदलिक, विठ्ठल भाई पटेल, अभय शुक्ला प्रमोद ठाकूर अशा 9 जणांवर भादविकलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.